Mumbai news Update : मुंबईतील वरळी सीफेसवर (Worli seaface) भरधाव कारने धडक (car accident) दिल्याने एका महिलेचा मृत्यू झालाय. जलक्ष्मी राम कृष्णन असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. वरळी-वांद्रे सीलिंकपासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या वरळी सीफेसवरील वरळी डेअरी जवळ रविवारी हा अपघात झालाय. मृत महिला ही दादर-माटुंगा परिसरातील रहिवासी आहे. वैद्यकीय चाचणीनंतर चालकाला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात चालक देखील जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने राजलक्ष्मी यांना मागून धडक दिली. कारच्या धडकेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की राजलक्ष्मी या हवेत उडाल्या आणि जमिनीवर आदळल्या. या अपघातानंतर त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात चालक सुमेर मर्चंट ( वय, 23, रा. ताडदेव ) हा देखील जखमी झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी चालकाला पकडून वरळी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली. त्यामध्ये तो दारूच्या नशेत नसल्याची पुष्टी झाली आहे. परंतु त्याच्या रक्ताचे नमुने प्रलंबित असून त्याच्यावर बेदरकारपणे वाहन चालवल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुमेर हा त्याच्या एका मैत्रीणीला सोडण्यासाठी तो गेला होता. मैत्रीणीला सोडून येताना हा अपघात झाला, अशी माहिती मिळाली आहे.
मृत राजलक्ष्मी या एका तंत्रज्ञान कंपनीच्या सीईओ होत्या. शिवाय त्या फिटनेस फ्रीक असून शिवाजी पार्कमधील जॉगर्स ग्रुपच्या एक भाग होत्या, अशी माहिती मिळाली आहे.
किनारी मार्गाच्या कामामुळे अपघाताचा धोका
वरळी सी-फेस परिसरात किनारी मार्गाचे काम सुरू असल्यामुळे तेथे चालण्यासाठी येणाऱ्यांना जागा अपूरी पडते. त्यामुळे अनेकांना समोरील पदथावर व रस्त्यावर जीव मुठीत घेऊन चालावे लागते, त्यातून अशा दुर्देवी घटना घडतात असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या