मुंबई : लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हेरून गर्दीचा फायदा घेत त्यांच्या दागिन्यांच्या बॅग चोरणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे क्राइम ब्रांचने ही कारवाई केली आहे. रेखा कांबळे आणि रोजा कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या दोन महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 4 लाख 27 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
कल्याण रेल्वे स्थानकातील चार नंबर फलाटावर आलेल्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या खांद्यावरील पर्स खेचून पळ काढल्याची घटना 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली होती. या पर्समध्ये त्यांचे सुमारे तीन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने होते.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदाराच्या मदतीने 15 डिसेंबर रोजी चिंचपोकळी रेल्वे स्टेशनच्या हद्दीतून रेखा कांबळे आणि रोजा कांबळे या महिलांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान त्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील रहिवासी असून त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिलांकडून गुन्ह्यातील 3 लाख 2 हजार आणि इतर दोन गुन्ह्यातील 1 लाख 25 हजार असा 4 लाख 27 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
चोरी करणाऱ्या सासू सुना
या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे पोलिसांनी अटक केलेल्या या दोन्ही सासू सुना असल्याचे तपासातून समोर आले आहे. रेखा कांबळे असे सासूचे नाव असून रोझा कांबळे असे सूनेचे नाव आहे.
दरम्यान, या सासू सुनेच्या जोडीने अशा प्रकारचे आणखी काय गुन्हे केले आहेत का? याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या