मुंबई : बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अवमान केल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकमध्येही शिवभक्तांनी या विरोधात आंदोलन करत दोषींवर कडक करावाई करण्याची मागणी केली आहे. त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावरून वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शिवसैनिकांनी पुणे येथे दिले. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. 
 
"शिवथाळी ( Shiv Bhojan Thali) हा प्रकार शिवसेनेच्या लोकांना त्यांचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी करुन दिलेली व्यवस्था आहे. महाराजांच्या नावे शिवथाळी चालवता आणि भ्रष्टाचार करता हा महाराजांचा अपमान नाही का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबबतचे ट्विट करून शिवसेनेवर टीका केली आहे. 







 
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजपनेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh ) यांनीही शिवथाळीवरून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. "ग्राहकांचा फोटो एकच पण नावे वेगवेगळी टाकून शिवभोजन थाळी योजनेतील अनुदान दलालांनी लाटले आहे. या माध्यमातून सरकारने आपल्या बगलबच्चांची सोय केली आहे. लहानग्यांना उपाशी ठेवण्याचं पाप केले आहे. गरीबांच्या हक्काचे भोजन दलालांच्या घशात कसे गेले, याची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. 




दरम्यान, राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. राज्यात बरेच मुद्दे सध्या तापलेले आहेत. त्यामुळे या अधिवेशनात अनेक मुद्दे विरोधकांच्या भात्यात असणार आहेत. अधिवेशनापूर्वी भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यात अधिवेशनातल्या रणनीतीवर खलबतं झाली. अशातच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. 


यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत.


महत्वाच्या बातम्या