मुंबई : छातीपासून बेंबीपर्यंत जोडले गेलेल्या 14 दिवसांच्या जुळ्या मुलींना वेगळे करण्यात वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांना यश आलं आहे. यासाठी डॉक्टरांना तब्बल सहा तासांचा कालावधी लागला. त्यानंतर या दोन जुळ्या मुलींना वेगळं करण्यात आलं.
याबाबत बोलताना वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे म्हणाल्या की, या मुलींच्या बाबतीत विचार केला तर त्यांची प्रसुतीपासून ते वेगळे करण्यापर्यंतची प्रत्येक गोष्ट आव्हानात्मक होती. हे आव्हान वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीरित्या पेलले आहे. वाडिया रुग्णालयातील ही अशाप्रकारची आतापर्यंतची चौथी यशस्वी शस्त्रक्रिया आहे. ज्यावेळी या मुली जन्माला आल्या त्यावेळी या दोन्ही बाळांचे एकत्रितरीत्या वजन 4.21 किलोग्रॅम इतके होते. त्यामुळे या बाळांचा जीव वाचवण्याकरता त्यांना विलग करणे गरजेच होतं. त्यामुळे ज्यावेळी बाळांचा जन्म झाला त्यावेळी त्यांना तात्काळ आयसीयुमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी बालरोग तज्ञ, नवजात शिशु तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, थोरॅसिक सर्जन आणि प्लास्टिक सर्जन या सर्व डॉक्टरांची मदत घेण्यात आली.
याबाबत बोलताना वाडिया रुग्णालयाच्या सीईओ मिनी बनवाल म्हणाल्या की, वाडिया रुग्णालयाने या अवघड आणि खर्चिक शस्त्रक्रियेसाठी कुठल्याही प्रकारचे पैसे घेतलेले नाहीत. आमच्यासाठी बाळांचा जीव वाचणं महत्त्वाचं होतं. वाडिया हॉस्पिटलमध्ये जुळ्यांना विभक्त करणारी ही चौथी यशस्वी शस्त्रक्रिया आहे. ज्यावेळी शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं त्यावेळी याबाबत पालकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. तसेच त्यांना या संपूर्ण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती. हार्मोनिक स्कॅल्पेल आणि टी सेलचा वापर करून यकृत कापण्याचे विशेष तंत्रज्ञान या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात आले. त्यामुळे या दोन्ही बाळांचा रक्त वाहण्याचा दर दहा मिलिलिटरपर्यंत कमी झाला होता. कॉन्जॉईटचा यशस्वी दर हा जवळपास पन्नास टक्के आहे. अचूक मूल्यांकन, नियोजन आणि व्यवस्थापनाच्या यशस्वी प्रयत्नानंतर आम्हाला शंभर टक्के यश मिळू शकलं त्यामुळेच ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया पार पडली. आता या लहान बाळांना सामान्य आयुष्य लाभलं आहे.
या मुलींचे आई-वडील शस्त्रक्रियेबाबत बोलताना म्हणाले की, जेव्हा आम्ही आई-बाबा होणार असं समजलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला होता पण जेव्हा आम्हाला या प्रेग्नेंसी मध्ये असलेल्या गुंतागुंती विषयी डॉक्टरांनी माहिती दिली तेव्हा मात्र आम्ही खूप घाबरलो. वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी आम्हाला शस्त्रक्रियेविषयी पूर्ण माहिती दिली आणि आम्हाला विश्वास देखील दिला की, दोन्ही मुली सामान्य जीवन जगू शकतात. विशेष म्हणजे रुग्णालयाने ही शस्त्रक्रिया मोफत केली असून आमच्यावर आर्थिक भार येऊ दिला नाही. शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर दोन्ही मुली विभक्त झाल्या त्यानंतर त्यांना आजपर्यंत कोणतीही समस्या आलेल्या नाहीत आणि आता या दोन्ही मुली सामान्य जीवन जगत आहेत.
संबंधित बातम्या :