मुंबई : 29 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली आहे. लोकलसंदर्भात चर्चेसाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी एक बैठक बोलावली आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बोलताना म्हणाल्या की, "लोकल सुरु करण्याबाबत मी कालच एक बातमी ऐकली आणि आजच आम्हला बोलवलंय. मला वाटतं कदाचित 29 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीपासून कदाचित मुंबई लोकलं सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे." त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, "जरी लोकल सुरु झाल्या तरी लोकांनी आपली काळजी घेतली पाहिजे. तोंडावरचा मास्क आणि हातात सॅनिटायझर तुमच्या जवळ असलं पाहिजे आणि सोशल डिस्टंन्सिग पाळणं गरजेचं आहे."


मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अटेंडन्ससाठी नवी सिस्टिम सुरु करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या कार्यालयात आता बायोमेट्रिक ऐवजी फेस रेकग्नेशन आणि आधार व्हेरिफाइड अटेंडन्स सिस्टम सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे कार्यलयात येणारे अधिकारी, कर्मचारी फेस रेग्ननेशन प्रणालीद्वारे आपली हजेरी लावणार आहेत. याचं उद्घाटन मुंबईच्या डी वॉर्ड कार्यलयात झालं. कोरोनाचा धोका कमी जरी झाला असला तरी, आरोग्याचा दृष्टिकोन समोर ठेवून ही प्रणाली बीएमसीच्या इतर कार्यलयात सुद्धा अवलंबली जाणार असल्याचं महापौर यांनी बोलताना सांगितलं. तसेच 'मुंबईत शाळा सुरू करण्याबाबत सावकाश निर्णय घेऊ, कारण लहान मुलांबाबत शाळा सुरु करायला अजूनही धोका आहेच, असं माझं वैयक्तिक मत आहे.' , असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी बोलताना सांगितलं.