मुंबई : मुंबई ते सिंधुदुर्ग अलायन्स एअरची सेवा अचानक रद्द करण्यात आली आहे.  अचानक रद्द झालेल्या सेवेमुळे गणपतीसाठी विमानाने गावी जाणाऱ्यांचे हाल झाले आहे. विमान अचानक रद्द होत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. प्रवाशांनी विमानातील कर्मचाऱ्यांना घेरले असून  काहीही करून आजच विमान सोडण्याची मागणी केली आहे. आज विमान सोडले नाही तर पुन्हा घरी जाणार नाही अशी भूमीका प्रवाशांनी केली आहे. 


सकाळी 11.30 चं अलायन्स एअरचं विमान अजून टी2 टर्मिनलवरच उभं आहे. विमानात एकूण ५२ प्रवासी आहेत, ज्यामध्ये डायबेटीस आणि अन्य व्याधीग्रस्त लोक देखील आहेत. मात्र एअरलाईनकडून ना जेवण दिलं जातंय, ना कुठलीही सोय केली जातेय. त्यामुळे सकाळी 6 किंवा 7 पासून घरातून निघालेले प्रवासी आता तीन वाजत आले तरी तात्कळत बसले आहेत. या प्रवाशांनी विमानातून फोन करून एबीपी माझाकडे आपली अवस्था कळवली आहे. 


मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित


मागील काही महिन्यांपासून चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित  आहे. चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा सुरु झाली होती. परंतु कालांतराने ही विमान सेवा अनियमित झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवासांना रस्ते मार्ग, रेल्वेने कोकणात जावे लागत होते. काहीजण गोवा विमानतळावर उतरून पुन्हा कोकणात यावे लागत असे.  कोकणच्या सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमधील चिपी विमानतळावरून (Sindhudurg Chipi Airport) आता अनियमित विमानसेवा सुरू आहे.  विमानसेवा अनियमित असून याकडे कोणत्याही राजकीय पक्षाचा लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात ही विमानसेवा बंद होईल की काय अशी भीती स्थानिकांना वाटू लागली आहे.


विमान अचानक रद्द होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. पालकमंत्र्यांनी लक्ष घालून ही सेवा पुन्हा नियमीत करावी व विमानाच्या वेळेत बदल करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  त्यानुसार नियोजन करून व्यापारी व इतर मंडळी नियोजन करीत असतात, मात्र तिकीट काढल्यानंतरविमान रद्द होते. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड होतो, असे अनुभवही काही प्रवाशांनी सांगितले यात सातत्य असावे. 


कसं आहे चिपी विमानतळ?


सिंधुदुर्गात जिल्ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढवणे व पर्यटनाचा विकास करणे या दृष्टिकोनातून हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. 274 हेक्‍टर जागेवर हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. विमानतळाची धावपट्टी 60 मीटर रुंद आणि 2.5 किलोमीटर लांबीचे  आहे. सध्या या ठिकाणी तीन विमान पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता 15 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय या ठिकाणी नाईट लँडिंगची ही व्यवस्था आहे. विमानात इंधन भरण्याचीही सोय या ठिकाणी आहे. 10 हजार चौरस मीटरचे टर्मिनल काम असून सुमारे 180 प्रवासी क्षमतेची विमाने या ठिकाणी उतरु शकतात. त्याशिवाय एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) टॉवर विमानांना उतरण्यास आणि उड्डाणास मदत करतो. विमानांना दिशा कळवण्याचे कामही टॉवर करतो. कुडाळ, कसाल आणि सातार्डा अशा तीन ठिकाणी या विमानतळाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.