मुंबई : मुंबईतील दिंडोशी परिसरातील नाल्यातून पोलिसांनी दहा तोळे सोनं ताब्यात घेतलं. खरंतर सोन्याने भरलेली पिशवी शोधण्यात उंदराने पोलिसांना मार्ग दाखवला, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एका महिलेने भिकारी स्त्रीला पाव दिला होता. परंतु पाव कोरडा असल्याने भिकारी स्त्रीने तो कचरकुंडीत फेकला होता. याच पिशवीत सोन्याचे दागिने होते, ज्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजच्या मदतीने पोलिसांना दागिन्यांची पिशवी कुठे आहे याचा शोध घेता आला.


सोन्याची पिशवी कचराकुंडीत कशी गेली?
दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरे कॉलनी परिसरात राहणारी सुंदरी नावाची महिलेला आपल्या मुलीच्या लग्नाचं कर्ज फेडायचं होतं. त्यासाठी घरातील दहा तोळे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवायचे होते. सुंदरी या घरकाम करतात आणि ती कामाला गेली होती. तिकडे त्यांच्या मालकांनी तिला सुकापाव खायला दिला. तिने तो पाव नकळत सोन्याच्या पिशवीत ठेवला आणि पुढे बँकेत जाण्यासाठी निघाली. वाटेत सुंदरीला एक भिकारी स्त्री आणि तिचे मूल दिसलं. सुंदरीने पिशवीत ठेवलेला पाव मुलाला दिला आणि निघून गेली. सुंदरी बँकेत पोहोचली तेव्हा तिला समजलं की तिने मुलाला दिलेली पावाच्या पिशवीत सोन्याचे दागिनेही ठेवले होते. सुंदरी लगेच बँकेतून निघाली आणि भिकारी स्त्री ज्याठिकाणी भेटली होती तिथे गेली. पण सुंदरी यांना ती स्त्री सापडली नाही. त्यानंतर त्यांनी तात्काळ दिंडोशी  पोलिसांत याबाबत तक्रार दिली.


दिंडोशी पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख सुरज राऊत यांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरु केला. अधिकारी सूरज राऊत यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता ती भिकारी महिला निघून जाताना दिसली. पोलिसांनी महिलेशी शोधून काढलं असता तिने सांगितलं की, पाव कोरडा असल्याने तो पिशवीसह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिला.




कसं शोधलं सोनं?
पोलिसांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पिशवी शोधण्यास सुरुवात केली मात्र ती तिथे सापडली नाही. पोलिसांनी कचराकुंडीजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पोलीस कचराकुंडीत जी पिशवी शोधत होते ती उंदराच्या ताब्यात असल्याचं दिसलं. प्रत्यक्षात एक उंदीर त्या पिशवीत घुसला आणि त्यात ठेवलेला वडापाव खात इकडे तिकडे फिरत होता. पोलिसांनी उंदराचा पाठलाग केला, तोपर्यंत उंदिर ती पिशवी घेऊन जवळच्या नाल्यात शिरला. पोलिसांनी नाल्यात शोधाशोध केली. तिथे सोन्याचे दागिने असलेलं पाऊच सापडलं. पोलिसांनी सोन्याची पिशवी ताब्यात घेऊन स्टेशनमध्ये आणली. त्यानंतर ती सुंदरीला परत केली.