मुंबई :  सोनं चोरणारे, पैसे लुटणारे चोर आपण सगळ्यांनीच पाहिलेत..पण कधी ताटे, चमचे, ग्लास  चोरणारे  चोरटे पाहिलेत का? नाही ना...  पण आशियातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या पालिका (BMC News) चक्क चमचे, ग्लास गायब करणारे आहेत. ही बाब समोर येण्याचे कारण म्हणजे मुख्यालयातील फलक आहे. पालिका मुख्यालयातील सूचना फलक सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. उपहारगृहातून भांडी बाहेर घेऊन जाऊ नका! अशी सूचना  करण्यात आली आहे. 


मुंबईचा डोलारा सांभाळणाऱ्या मुंबई मुख्यालयाच्या  उपहारगृहातून गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी शेकडो भांडी गायब झाली आहेत. त्यामुळे कंत्राटदाराचं मोठे नुकसान झाले असून  भांडी आणि चमचे घरी घेऊन जाऊ नका असा फलकच पालिका मुख्यालयात लावण्यात आला आहे.  पालिकेतील काही कर्मचारी आणि अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयातच मागवतात. जेवण झाल्यानंतर भांडी कार्यालयात तशीच ठेवली जातात, ती परत केली जात नाहीत. अधिकारी घरी गेल्यावर ताटं आणि चमचे चोरीला जातात. त्यामुळे वर्षभरात हजारो भांडी कमी झाली असून कंत्राटदाराचं 40 ते 50 हजारांचे नुकसान झालंय. यावर उपाय म्हणून, भांडी आणि चमचे घरी घेऊन जाऊ नका असा फलकच पालिका मुख्यालयात लावण्यात आला आहे. 




कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी भांडी मागितल्यास घरातून आणल्याचे सांगितले जाते. या बनवाबनवीमुळे उपहारगृह चालक मेटाकुटीला आले असून भांडी परत करण्याचे आवाहन त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले आहे. उपहारगृहातून हजारो चमचे, ताटे, ग्लास गायब झाल्याने यापुढे उपहारगृहाबाहेर भांडी घेऊन जाऊ नका असे आवाहन कर्मचारी, अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. तशी विनंती करणारा फलक कॅन्टीन मध्ये झळकवण्यात आला आहे.


हरवलेल्या भांड्यांची यादी



  • चमचे - सहा  ते सात हजार

  • लंच प्लेट - 150 ते 200

  • नाश्ता प्लेट - 300 ते 400

  • ग्लास - 100 ते 150


या राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचे बजेट मोठं


देशातील त्रिपुरा, नागालँड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, सिक्कीम आणि गोवा या राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचं बजेट मोठं आहे. मुंबई महापालिकेच्या ठेवी या 80 हजार कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे बजेट 52 हजार कोटी आणि मुदत ठेवी 80 हजार कोटी असे एकूण 1.32 हजार कोटींहून अधिक भांडवल असलेली मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते.  त्यामुळे या राज्यांची सत्ता मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे राजकीय पक्ष प्रयत्नशील असतात, त्याहून जास्त प्रयत्न मुंबई महापालिकेसाठी केला जातो.


इतर महत्त्वाच्या बातम्या :