Mumbai News : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा अत्यंत सक्षमपणे आणि अव्याहतपणे पुरवणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत असते. ही काळजी अधिक समर्थपणे घेता यावी आणि नागरिकांना देखील अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत, या हेतुने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कार्यान्वित करण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवार, दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता धारावी परिसरात होणार आहे. 


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक खासदार राहुल शेवाळे, स्थानिक आमदार श्रीमती वर्षा गायकवाड, आमदार सुनिल शिंदे, राजहंस सिंह आणि महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे आणि मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे.


धारावी परिसरातील शीव-वांद्रे लिंक रोड नजिक असणाऱ्या ओएनजीसी इमारतीच्या प्रवेशद्वार क्रमांक 2 नजिक आयोजित होणाऱ्या समारंभा दरम्यान दृकश्राव्य प्रणालीचा वापर करुन 51 ठिकाणी उभारण्यात आलेल्या दवाखान्यांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. तर येत्या 6 महिन्यात ही संख्या 220 दवाखान्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हे दवाखाने उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत पोर्टा केबिनमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तर काही दवाखाने हे सध्या उपलब्ध असलेल्या दवाखान्यांच्या जागेत सुरु करण्यात येणार आहेत. या दवाखान्यांमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी तसेच 147 प्रकारच्या रक्तचाचण्या देखील मोफत करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त क्ष-किरण चाचणी (एक्स रे), सोनोग्राफी यासारख्या चाचण्यांकरीता पॅनलवर असणाऱ्या वैद्यकीय चाचणी केंद्रांमधून करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या चाचण्या जरी खासगी केंद्रातून करण्यात येणार असल्या तरी त्या महानगरपालिका रुग्णालयांच्या दरानुसार शुल्क आकारणी करुन करण्यात येणार आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे. 


याबाबत अधिक माहिती देताना डॉ. (श्रीमती) गोमारे यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजने अंतर्गत सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा नागरिकांना त्याच्या सोयीनुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी उपलब्ध दवाखान्यांमध्ये दुसऱ्या सत्रात आणि मोकळ्या जागेत पोर्टा केबिन स्थापित करुन त्यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. यानुसार पहिल्या टप्प्यात दिनांक 17 नोव्हेंबर 2022 पासून 51 दवाखाने सुरु करण्यात येत आहेत. तर साधारणपणे पुढील सहा महिन्यात 20 पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर यासह 149 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरु करण्याकरिता टप्पेनिहाय कार्यवाही सुनियोजितप्रकारे करण्यात येणार आहे. यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण या योजने अंतर्गत एकूण 220 ठिकाणी आरोग्य व वैद्यकीय सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजनेमुळे नागरिकांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा मोफत व सोईच्या वेळेनुसार सहज उपलब्ध होईल. नागरिकांचा औषध उपचारावर खिशातून होणारा खर्च (Out of Pocket Expenditure) कमी होण्यास मदत होईल. या योजने अंतर्गत साधारणपणे 25 ते 30 हजार लोकसंख्येसाठी 1 दवाखाना, याप्रमाणे पोर्टा केबिन मधील दवाखाने हे सकाळी 7 ते दुपारी 2, त्यानंतर दुपारी 3 ते रात्री 10 या कालावधी दरम्यान कार्यरत असणार आहेत. तर उपलब्ध दवाखान्यांमध्ये सुरु करण्यात आलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने हे सकाळी 9 ते दुपारी 4 आणि दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत सुरु करण्यात येत आहेत. यासाठी प्रत्येक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी (MBBS), 1 परिचारिका, 1 औषध निर्माता आणि 1 बहुउद्देशीय कामगार यांची नेमणूक करण्यात आली आहे. 


तसेच उपलब्ध दवाखान्याची दर्जोन्नती करून विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध दवाखान्यात पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत देण्यात येत आहे. उपलब्ध दवाखान्याची दर्जोन्नती करून (कान-नाक-घसा तज्ञ, नेत्रचिकित्सा, स्त्री-रोग तज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचा रोग तज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ञ आदी) विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध दवाखान्यात पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत देण्यात येणार आहे. 


सदर दवाखान्यांमधून टॅब पद्धतीने आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा आणि वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशील नोंदविण्यात येईल, ज्यायोगे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखानेचे कामकाज हे विना कागद पद्धतीने (पेपरलेस) असणार असून त्यामुळे हे दवाखाने इकोफ्रेन्डली देखील असणार आहेत, असेही सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.