मुंबई : स्फोटक प्रकरणात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर इनोव्हा कारमधून पीपीई किट घालून एक व्यक्ती खाली उतरला होता. या पीपीई किटमध्ये कोण आहे? याचा शोध घेतला जात आहे. आता फॉरेंसिक ह्यूमन अॅनॅलिसिसच्या माध्यमातून फॉरेंसिक एक्सपर्ट्स या पीपीई किटमध्ये कोण आहे याचा शोध लावू शकतात अशी माहिती आहे. मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या फॉरेंसिक एक्स्पर्ट डॉक्टर हेमलता पांडे  यांनी या प्रक्रियेबाबत माहिती दिली. या प्रक्रियेला 'फॉरेंसिक पोडियाट्री' असं म्हणतात. 


पांडे यांनी सांगितलं की, या विषयाचा अभ्यास मी लंडनमध्ये केला आहे. माझे प्रोफेसर हेडन केली यांनी 2000 साली याच प्रक्रियेचा वापर करुन एका चोराला शिक्षा देण्यात मदत केली होती. त्या चोराने आपली ओळख लपवण्यासाठी अनेक कपडे घातले होते. आणि चेहरा पूर्णपणे झाकला होता.  


कशी असते प्रक्रिया


या प्रक्रियेत व्हिडीओ अँगलनं रेकॉर्डिंग केलं जातं. चौकशी अधिकाऱ्यांना माहिती असतं की अशावेळी संशयित खोटा अभिनय करु शकतो. त्यामुळं संशयिताला माहिती न पडू देता त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो. याला गेट सायकल म्हणतात. ज्यामध्ये दोन पायांमधील अंतर मोजलं जातं. किती वेगाने चालतो, कंबरेपासून गुडघ्यापर्यंत आणि गुडघ्यापासून पायाच्या तळव्यापर्यंतचं माप घेतलं जातं. यानंतर या फुटेजची सीसीटीव्ही फुटेजशी तुलना केली जाते. त्यातून अंदाज लावला जाऊ शकतो की पीपीई किटमधील व्यक्ती तीच आहे की नाही.  


पोलीस अधिकारी सचिन वाझे निलंबित
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आलं आहे. सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत. एनआयएकडून झालेल्या चौकशी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. स्कॉर्पिओ कारमध्ये ही स्फोटकं आढळली होती. तसेच एक इनोव्हा कारही या परिसरात फिरत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं होतं. या इनोव्हा कारमधून पीपीई किट घालून एक व्यक्ती खाली उतरला होता. एनआयए या व्यक्तीचा शोध घेत आहे. ती व्यक्ती सचिन वाझे असल्याचा संशय एनआयच्या टीमला आहे.