Mumbai News : परराज्यातील किंवा परदेशातून जे पर्यटक मुंबई (Mumbai) पाहायला येतात त्यांची पावलं हमखास गेट वे ऑफ इंडियाकडे (Gateway Of India) वळतात. मात्र पुढचे काही दिवस गेटवे ऑफ इंडिया बंद ठेवण्यात येणार आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी सहा दिवसांपूर्वी संशयास्पद बोटीत शस्त्र सापडली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत गेटवे ऑफ इंडिया बंद राहिल.


मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर आजपासून सहा दिवसांपूर्वी माय लेडी हान नावाची संशयास्पद बोट सापडली होती. या बोटीची तपासणी केली असता त्यात तीन AK-47 रायफल आणि अनेक राऊंड्स गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. ही संशयास्पद सापडल्यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.


एबीपी न्यूजची टीम जेव्हा गेट वे ऑफ इंडिया इथे पोहोचली तेव्हा समजलं की, इथून सुटणाऱ्या बोटीचं तिकीट ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच आत सोडलं जात आहे. इतर कोणालाही तिथे जाण्याची परवानगी नाही.


एबीपीने इथे अनेक लोकांशी बातचीत केली. त्यापैकी एका पर्यटकाने म्हटलं की, "हे पर्यटन स्थळ 26/11 हा दहशतवादी हल्ल्याचा साक्षीदार आहे. त्यामुळे यंत्रणांनी काही विचार करुनच हे बंद केलं असेल." तर "मुंबईपासून दूर जर एखादी घटना घडली तर मुंबईत बंदी घालू नये," असं काही पर्यटकांचं म्हणणं आहे.


दरम्यान हरिहरेश्वर समुद्रकिनारी सापडलेल्या संशयास्पद बोट प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने आर्म्स अॅक्ट अंतर्गत अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र एटीएस या प्रकरणी संबंधित कंपनीशी बातचीत करुन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एटीएसने आतापर्यंत कोणतीही थिअरी फेटाळलेली नाही.


काय आहे प्रकरण? 
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर मागील आठवड्यात गुरुवारी (18 ऑगस्ट) सकाळी 16 मीटर लांबीची एक संशयास्पद बोट सापडली होती, ज्यावर तीन एके-47 रायफल आणि काडतुसं सापडली होती. यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. दहीहंडीचे कार्यक्रम आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर बोटीवर शस्त्रं सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, या प्रकरणात कोणताही दहशतवादी संबंध सापडला नसल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. या संशयास्पद बोटीचं नाव लेडी हान असून तिची मालकी एका ऑस्ट्रेलियन महिलेकडे असल्याची माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. या बोटीतून तीन 'अ‍ॅसॉल्ट रायफल', स्फोटकं आणि कागदपत्रंही जप्त करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं.