Mumbai News : मुंबईतील (Mumbai) कुर्ला (Kurla) भागातील मुस्लीम समाजातील लोक रेल्वे प्रशासन (Railway) आणि महापालिका प्रशासनावर (BMC) प्रचंड नाराज आहेत. अंत्यसंस्कार करण्यासाठी परिसरातील कब्रस्तानमध्ये पार्थिव नेण्यासाठी रस्ता नसणं हे या नागरिकांच्या नाराजीचं प्रमुख कारण आहे. मुंबई महापालिकेने 2019 मध्येच रेल्वे प्रशासनाला पूल (Bridge) बांधण्यासाठी 8 कोटी 64 लाख रुपये दिले होते, परंतु तीन वर्षांनंतरही पूल बांधण्याचं काम अद्याप सुरु झालेलं नाही. 


मुंबईत कुर्ल्यातील मुस्लीम नागरिकांना जगण्याच्या संघर्षाबरोबरच अखेरच्या प्रवासाचा देखील संघर्ष करावा लागत आहे. कुर्ला पश्चिम भागात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे पार्थिव कुर्ला पूर्वेला असलेल्या कब्रस्तानात नेण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे इथल्या लोकांना आपल्या परिवारातील सदस्याचे पार्थिव थेट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरुनच न्यावं लागतं. अशा परिस्थितीत या लोकांना त्रास तर होतोच, शिवाय रेल्वे प्रवाशांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो.


पार्थिव कब्रस्तानात नेण्यासाठी कसरत 
कुर्ला इथे पश्चिम दिशेकडून पूर्वेला असणाऱ्या कब्रस्तानात जाण्यासाठी अंत्ययात्रेत साधारण शंभरते दीडशे लोक उपस्थित असतात. ही अंत्ययात्रा फलाटावरील पदाचारी पूल चढून न्यावी लागत असल्याने खांदेकऱ्यांना ते पार्थिव तिरकं करावं लागतं आणि आडव्या अवस्थेत मृतदेह उचलून द्यावा लागतो. त्यामुळे काही वेळा हा मृतदेह त्या जनाजावरुन खाली पडण्याची देखील भीती असते. त्यामुळे जर एखाद्या वेळी हा मृतदेह जनजावरुन खाली पडल्यास मोठी दुर्घटना होण्याची  शक्यता असते. 


बीएमसीकडून पैसे मिळाले परंतु अद्याप पुलाच्या बांधकामाला सुरुवातच नाही
स्थानिक रहिवासी लतीफ शेख यांच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये बीएमसीने स्वतंत्र पूल बांधण्यासाठी 8 कोटी 64 लाख रुपये रेल्वेला दिले आहेत. मात्र अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही रेल्वेकडून पूल बांधण्याचं काम सुरु करण्यात आलेलं नाही. हा पूल ज्या झोपडपट्टी भागात बांधला जाणार आहे, तिथे शेकडो लोक राहत असल्याचा आरोप रेल्वेने केला आहे. बीएमसीने आतापर्यंत या झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना हटवलेलं नाही.


रेल्वे, बीएमसीचा ढिसाळ कारभार
कुर्ल्यात राहणाऱ्या मुस्लीम समाजातील नागरिकांना रेल्वे आणि बीएमसीच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसत आहे. मात्र, त्याच वेळी आरपीएफकडून रेल्वे प्रवाशांना होणारा त्रास पाहता रेल्वे फूट ओव्हर ब्रिजवरुन पार्थिव नेण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु मुंबई महापालिकेने सुमारे 8 कोटी 64 लाख रुपये देऊनही पूल बांधण्याचे काम का सुरु झालेलं नाही, हा प्रश्न अद्यापही कायम आहे.


संबंधित बातमी


मुंबईतील लोकल स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून निघते अंत्ययात्रा! प्रशासनाचे दुर्लक्ष