Mumbai Kurla News : आंतरराष्ट्रीय शहर अशी मुंबईची ओळख आहे. या मुंबईत अनेक जण आपले स्वप्न घेऊन येतात. काही जणांची पूर्ण होतात तर काहीजणांची अपूर्ण राहतात. यात अनेकांना कष्ट हे करावेच लागतात, स्ट्रगल हा कोणाच्याही वाट्याला चुकलेला नाही. मात्र, याच मुंबईत कुर्ल्यातील मुस्लिम नागरिकांना जगण्याच्या संघर्षाबरोबरच अखेरच्या प्रवासाचा देखील संघर्ष करावा लागतोय. कुर्ला हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण आहे. कुर्ला परिसरात नाश्ता पदार्थापासून ते अनेक प्रकारचे साहित्य खरेदी विक्री येथे होते. रोज हजारो लोक काही ना काही कामासाठी या कुर्ल्यात येतात. माञ या कुर्ला पश्चिम भागात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचे पार्थिव कुर्ला पूर्वेला असलेल्या कब्रस्तानात नेण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे इथल्या लोकांना आपल्या परिवारातील सदस्याचे पार्थिव थेट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरूनच न्यावे लागते.
कुर्ला येथे पश्चिम दिशेकडून पूर्वेला असणाऱ्या स्मशानभूमीत जाण्यासाठी अंत्ययात्रेत साधारण शंभरते दीडशे लोक उपस्थित असतात. ही अंत्ययात्रा फलाटावरील पदाचारी पूल चढून न्यावी लागत असल्याने खांदेकऱ्यांना ते पार्थिव तिरकं करावं लागतं व आडव्या अवस्थेत मृतदेह उचलून द्यावा लागतो. त्यामुळे काही वेळा हा मृतदेह त्या जनाजावरून खाली पडण्याची देखील भीती असते. त्यामुळे जर एखाद्या वेळी हा मृतदेह जनजावरून खाली पडल्यास मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता असते. या समस्या संदर्भात स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्याशी संपर्क केला असता, मी पाठपुरावा करत आहे असं म्हणत कॅमेरावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
मागील अनेक वर्ष मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील यांच्याकडे या रस्त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. मात्र, सर्वजण होकारात्मक माना डोलवतात पण त्याचे पुढे काहीच होत नाही. त्यामुळे या प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे समाजाला अद्याप देखील मरण यातना सोसाव्या लागत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या ब्रिजची मागणी होतीय. तो ब्रीज मार्ग रेल्वेच्या जागेतून जाणार असल्यामुळे त्याला मध्य रेल्वेची व काही ठिकाणी महापालिकेची परवानगी गरजेची होती. याबाबतीत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. अनेक वर्षाच्या प्रयत्नानतर ब्रीज गेल्यावर्षी अप्रुव झाला पण रेल्वेकडून अद्यापही याचे टेंडर निघालेले नाहीत. काम ही सुरू झाले नाही. रेल्वे प्रशासनाच्या वतीने या ब्रिज संदर्भात माहिती घेऊन सांगू असे जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आजही कुर्ला स्थानकातून अंतयात्रा निघते हे किती दुर्दैवी आहे.