Mumbai News : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या (Underworld Don Dawood Ibrahim) हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हत्येचा कट आखण्यात आला आहे, अशी माहिती देणारे ऑडिओ मेसेज (Audio Message) एका अज्ञाताकडून मुंबई (Mumbai News) वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आल्याची माहिती मिळाली. धक्कादायक मेसेजनंतर पोलिसांकडून याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली.
मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात पुन्हा एकदा एक थक्क करणारा मेसेज आला आहे. यावेळी मात्र एकापाठोपाठ एक अशा अनेक ऑडिओ क्लिप वाहतूक नियंत्रण कक्षाच्या नंबरवर आल्या. यामध्ये एका अज्ञात इसमानं दावा केला होता की, "अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत आहेत. तसेच, हे हस्तक देशाला बर्बाद करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही या अज्ञात इसमानं म्हटलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी वाहतूक नियंत्रण क्रमांकावर 7 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज आले. त्यापाठोपाठ 21 तारखेला पुन्हा 12 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज प्राप्त झाले.
एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, धक्कादायक मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. पोलिसांच्या तपासाची सूत्रं एका इसमाजवळ जाऊन थांबली. या व्यक्तिसंदर्भात चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. या प्रकरणाच्या तपासाअंती असं आढळून आलं की, मेसेज करणाऱ्या व्यक्ती पूर्वी एका हिऱ्यांच्या कंपनीत दागिने डिझाईन करत होता. परंतु, मानसिक आजारामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. तो सध्या वर्षभरापासून बेरोजगार आहे." या व्यक्तिवर पोलिसांनी कोणती कारवाई केली की, नाही? यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.