मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत 'मालमत्ता कर' असणार आहे. नागरिकांनी वेळेत महापालिकेकडे जमा करावा यासाठी महापालिकेने कारवायांचा धडाका सुरु केला आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात सुरु असलेल्या या धडक कारवाई मोहिमेंतर्गत मालमत्ता कर थकबाकीपोटी आतापर्यंत अनेक ठिकाणी अलिशान वाहनांची जप्ती करण्याचा पर्याय वापरण्यात आला, तर काही ठिकाणी जल-जोडणी खंडित करण्यात आली. ज्यानंतर अनेक प्रकरणी संबंधितांद्वारे मालमत्ता कर रकमेचा भरणा महापालिकेकडे करण्यात आला आहे. यानुसार आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये रुपये 5 हजार 200 कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे लक्ष्य असून आजपर्यंत रुपये 3 हजार 650 कोटी एवढा मालमत्ता कर जमा झाला आहे.
महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या कारवायांपैकी 5 बड्या कारवाया
1. 'एम पश्चिम' विभाग कार्यक्षेत्रातील मे. चंदुलाल पी.लोहना (विकासक मे. जय कन्स्ट्रक्शन) यांची मालमत्ता कराची रुपये 38 लाख 80 हजार 705 इतकी थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची बीएमडब्लू कार जप्त करण्यात आली. त्यानंतर संबंधितांद्वारे रुपये 19 लाख इतकी रक्कम जमा करुन गाडी सोडवून नेण्यात आली.
2. एम पश्चिम विभाग कार्यक्षेत्रातील मे. युनीटी लॅण्ड कन्सल्टन्सी यांची मालमत्ता कराची रुपये 1 कोटी 10 लाख 22 हजार 240 इतकी थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची 'ब्रीझा कार' जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या बांधकामाच्या जागेवरील ऑफिस 'सिल' केले आणि बांधकाम कार्य बंद करण्यात आले.
3. 'एच पूर्व' विभागाच्या हद्दीतील पक्षकार मे. भारत डायमंड बोर्स यांच्या प्रतिदानाच्या विवादा प्रकरणी तोडगा काढून रु. 25.86 कोटी इतकी मालमता कर वसूली करण्यात आली. तसेच 'मे. रिलायन्स इंडस्ट्रिज लि.' यांच्या विविध मालमत्तांच्या भांडवली मूल्याविरोधातील प्रलंबित तकारी प्रकरणातून पक्षकाराकडून रु. 39 कोटी इतक्या मालमता कराच्या रक्कमेची वसूली करण्यात आली.
4. 'के पूर्व' विभाग हद्दीतील अंधेरी असणाऱ्या 'सोलिटेयर कॉर्पोरेट पार्क' आणि 'वरटेक्स बिल्डिंग' यांच्या जलजोडण्या खंडित करण्यात आल्या. तसेच मलवाहिनीही थोपवण्यात आली. या कारवाईनंतर मालमत्ता धारकांनी थकीत रकमेच्या 50% रक्कम, अर्थात अनुक्रमे रक्कम रुपये 9.60 कोटी आणि 31 लाख रुपये भरण्यात आले.
5. मुंबई महानगरपालिकेच्या 'एम पश्चिम' विभाग कार्यक्षेत्राच्या हद्दीतील 'आय मॅक्स थिएटर'ची मालमत्ता कराची थकबाकी ही रुपये 75 लाख इतकी झाली असल्यामुळे संबंधित मालमत्तेची जलजोडणी खंडित करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :