BJP Advt on BEST Bus: मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा कोरोनाचे संकट काही प्रमाणात दूर झाल्याने गणेशोत्सव निर्बंधांशिवाय पार पडत आहे. आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनीदेखील गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. मात्र, बेस्ट बसवर भाजपने लावलेल्या जाहिरातींवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या जाहिरातींवर सामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई भाजपच्यावतीने बेस्ट बसेसवर मोठ्या प्रमाणावर जाहिराती लावण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमध्ये 'आपले सरकार आले...हिंदू सणांवरचे विघ्न टळले' अशी ओळ आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. तर एका बाजूला भाजपचे निवडणूक चिन्ह 'कमळ' आहे. या जाहिरातीमधून आधीच्या सरकारच्या काळात हिंदू सणांवरच निर्बंध होते, असे सुचवण्यात येत असल्याची चर्चा आहे.
भाजपच्या या जाहिरातीवर शिवसेनेसह काँग्रेसनेही नाराजी व्यक्त केली आहे. बेस्टही सार्वजनिक मालमत्ता असून त्यावर विशिष्ट पक्षाचा धर्माचा प्रचार केला जाणं चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. बेस्ट बसवरील जाहिरातीचे कंत्राट एका खासगी कंपनीकडे आहे. ही कंपनी बेस्ट प्रशासनाला एक ठाराविक रक्कम देते. तर, जाहिरातीचे अधिकार या कंपनीला मिळतात.
भाजपच्या या जाहिरातीविरोधात राजकीय पक्षांसह सामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या काळात असलेले सरकारचे निर्बंध योग्य होते असेही काहींनी म्हटले आहे. तर, कोरोना काळात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने निर्बंध लागू केले होते. हे निर्बंध सर्वांसाठी होते. त्यामुळे फक्त एका विशिष्ट धर्मावर विघ्न आले होते असे म्हणणे चुकीचे असल्याचा मुद्दाही काहींनी उपस्थित केला आहे. श्याम पारखे या मुंबईकराने भाजपच्या जाहिरातीविरोधात बेस्ट प्रशासनाकडे तक्रार दिली आहे. त्याशिवाय, काही मुंबईकरांनी सोशल मीडियावरही जाहिरातींविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबई भाजपकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही.
मागील दोन वर्षांपासून कोरोना महासाथीच्या आजारातचे संकट होते. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे निर्बंध लागू केले होते. या निर्बंधामुळे कोरोनाच्या पहिल्या वर्षात गणेशोत्सवात कठोर निर्बंध होते. तर, दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट कायम होते. त्यामुळे निर्बंधासह गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. राज्यात दोन महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरे होणार असल्याचे जाहीर केले. गणेशोत्सव मंडळांसाठी गणेश मूर्तीवरील निर्बंध ठेवण्यात आले नाही. कोरोनाच्या सावटानंतर दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.