Ganesh Utsav 2022 : यंदा गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav live) निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने (Maharashtra Govt) एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. यंदा मुंबईमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या देशातील महावणिज्य दूत यांना पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन करवण्यात येणार आहे. यासाठी पर्यटन विभागाकडून 2 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर या तारखांची निवड करण्यात आलेली आहे. 


आज एमटीडीसीच्या (MTDC) वतीने लालबागच्या राजाचं यासोबतच गिरगावच्या राजाचं आणि माटुंगाच्या जीएसबी गणपतीचं या सर्व कॉन्सिलेट जनरल यांना दर्शन करवण्यात येईल. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा स्वतः लालबागचा राजाचं दर्शन घेते वेळी या सर्व शिष्टमंडळासोबत उपस्थित राहणार आहेत. याबाबत माहिती देताना एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय महासंचालक जयश्री भोज म्हणाल्या की, या उपक्रमाचं हे पहिलं वर्ष आहे. या उपक्रमामुळे नक्कीच परदेशातील नागरिकांपर्यंत गणेशोत्सवाबाबत माहिती पोहोचेल आणि या उपक्रमाला पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असं भोज यांनी सांगितलं आहे. 


मुंबईतील महत्वाच्या गणपतींविषयी जाणून घ्या...



मुंबईचा राजा -
मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या लालबागमधील गणेशगल्लीच्या गणपतीचं यंदाची मूर्ती आणि सजावट आकर्षक असणार आहे. मुंबईतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 95 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या मित्र मंडळाने यावर्षी काशी विश्वनाथ मंदिराचा भव्य देखावा साकार केला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना मुंबईचा राजा  विश्वकर्मा रुपात पाहायला मिळणार असून भव्य अशी 22 फुटांची मूर्ती मुंबईच्या राजाची असणार आहे. 


लालबागचा राजा - 
'नवसाला पावणारा बाप्पा' अशी ख्याती असलेल्या मुंबईतील 'लालबागचा राजा' (Lalbaugcha Raja)  च्या दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागते. लालबागच्या राजा ज्या ठिकाणी विराजमान असतो, त्याच ठिकाणी बाप्पाची मुर्ती साकारली जाते. सर्वात आधी पाद्यपूजन सोहळा पार पडतो. आणि या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते. त्यामुळे लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. या वर्षी मंडळसाठी विशेष आकर्षण असणार आहे.  कारण, लालबागचा राजा गणपती उत्सवाचे हे 89 वे वर्षे आहे. जर तुम्हाला घरबसल्या लालबागच्या राजाचं दर्शन हवं असेल तर मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर, यु ट्यूब वर ऑनलाइन मिळेल. 


चिंचपोकळीचा चिंतामणी -
चिंचपोकळीचा चिंतामणी म्हटलं की त्याचा आगमन सोहळा हा सर्वात प्रसिद्ध आहे. सर्वात दणकेबाज आगमन म्हणजे चिंताणीचंच होत असल्याचं आजवर दिसून आलं आहे. त्यात या मंडळाचे टी-शर्ट अगदी सर्व मुंबई आणि आसपासच्या परिसरातच नाही तर महाराष्ट्रातील बऱ्याच गावात देखील पोहोचले आहेत. गणपतीच्या आगमनाच्या दोन-तीन महिने आधीपासूनच या मंडळाच्या स्पेशल टीशर्ट पॅटर्नचा मेसेज व्हायरल होतो. त्यानुसार विविध गणेशभक्त मंडळाजवळ येऊन टी-शर्टचे पैसे भरुन टी-शर्ट बुक करतात आणि आगमन सोहळ्यादिवशी घालून लाडक्या बाप्पाचं आगमन करतात.
 
जीएसबी  - 
माटुंगा येथील जीएसबी सेवा (गौड सारस्वत ब्राह्मण) गणेश मंडळाला मुंबईतील सर्वात धनाढ्य गणपती म्हणून ओळखलं जातं.  यंदा या गणेश मंडळाने यंदाही आपली परंपरा कायम राखली आहे.  श्री गणेशमूर्ती मंडप इतर साहित्याचा त्यांनी तब्बल 300 कोटींचा विमा उतरवला आहे. जीएसबी मंडळाच्या गणेश मूर्तीमध्ये 68 किलो सोने आणि 327 किलो चांदी आहे. तसेच मंडप तयार करण्यासाठी 315 किलो चांदीचा वापर करण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे.  


तेजुकाय मेन्शन गणपती -
अनेक गणेशभक्त लालबागच्या राजाचे दर्शन घेल्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळ तेजुकाय मेंशनच्या गणरायाचे दर्शन घ्यायला नक्कीच जातात. हे मंडळ देखील गणेश गल्ली आणि चिंतामणी इतकेच प्रसिद्ध आहे. तेजुकाय गणपती बाप्पाची मुर्ती अतिशय सुंदर आणि रेखीव असते. यामुळेच तेजुकाय मंडळाच्या वतीने साकारल्या जाणाऱ्या देखाव्यासोबतच मुर्तीचं देखील सर्वांनाच आकर्षण असते. 


खेतवाडीचा महाराजा - 
परशुराम रुपी मुंबईच्या महाराजाच्या गणेश मूर्तीची उंची तब्बल 38 फुटांची आहे. दोन वर्षांमध्ये गणेश मूर्तींच्या उंचीचे निर्बंध हटवल्यानंतर ही आतापर्यंतची सर्वात उंच गणेशमूर्ती यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. खेतवाडी गणेशोत्सव मंडळ हे उंच गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी हे प्रसिद्ध आहे. त्यामध्ये खेतवाडी अकरावी गल्ली, मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी ही उंच मूर्ती घडवली आहे. या मूर्तीच्या समोर गुरुकुलाचा देखावा साकारण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांना उंचच उंच गणेश मूर्तींचे दर्शन घेता येणार आहेच शिवाय वेगवेगळे आकर्षक देखावे सुद्धा पाहायला मिळणार आहेत.


परळचा राजा
भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी म्हणजे 1947 मध्ये या मंडळाची स्थापना झाली. नरे पार्कचा राजा किंवा परळचा राजा अशा नावाने सर्वत्र परिचीत आहे. परळच्या राज्याला भेट देण्यासाठी असंख्य भाविक दर वर्षी येत असतात. यंदा या मंडळाला 75 वर्ष पूर्ण झाले आहे.