Mumbai Aarey : मुंबईतील गोरेगाव चेक नाका ते मरोळ नाकाला जोडणारा आरे कॉलनीमधला (Aarey Colony Road Closed) मुख्य मार्ग मुंबई पोलिसांनी पूर्ण बंद केला आहे. गोरेगाव चेक नाक्यावर (Goregaon) आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी 24 तासांसाठी बंद असणार आहे. मुंबई महापालिका (MCGM) आणि मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) कामासाठी रस्ता बंद करण्यात आल्याचे कारण मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai traffic Police) दिले आहे. आरे मेट्रो कारशेडच्या (Aarey Metro Carshed) कामासाठी झाडे तोडली जात असल्याचा संशय पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
हा मार्ग बंद असल्याने आरे मार्गे पवईला जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्याच्या परिणामी आता पवईला जाण्यासाठी जेव्हीआरएल मार्गांवरून जावे लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरे कॉलनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना आरे कॉलनीतील मार्ग वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
नेमकं काम काय?
आरेमधील रस्ता अचानकपणे बंद करण्यात आल्याने मुंबईकर आणि पर्यावरणप्रेमींमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. आरे कॉलनीतील रस्त्याच्या लगत असलेल्या वृक्षांची छाटणी केली जात असल्याचे म्हटले जात आहे. सकाळच्या सुमारास मेट्रो कारशेडच्या जागेवर असलेली झाडे कापली जात नसल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, सकाळी 9 वाजल्यानंतर मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित जागेवरील झाडे तोडली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
पर्यावरणप्रेमींना पोलिसांच्या नोटिसा
मुंबईतील आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात येत असल्याचे समोर आले आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर पर्यावरणप्रेमींकडून रविवारी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिशीद्वारे जमावबंदी लागू करण्यात आली आहे.