मुंबई : कोरोनाचा बनावट अहवाल तयार करुन लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या टेक्निशियनला अटक करण्यात आली आहे. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असूनही त्यांना निगेटिव्ह असल्याचा अहवाल देऊन खोटी माहिती देत होता. मुंबईतील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमार्फत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अब्दुल साजिद खान नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
आरोपी एस-एस पॅथलॉजी लॅबमध्ये टेक्निशन म्हणून काम करत होता. ही बाब मुंबईच्या थायरोकेअर टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये लीगल एक्झिक्युटिव्ह पदावर काम करणाऱ्या बिरुदेव सर्वदे यांच्या लक्षात आली. त्यांच्या कंपनीत सर्व्हिस प्रोव्हायडर क्लायंट म्हणून काम करणाऱ्या अब्दुल साजीद खानने रमेश खबरानी नावाच्या रुग्णाला त्याच्या रक्ताचे आणि अन्य नमुन्यांचा निकाल येण्याआधीच थायरोकेअर कंपनीच्या लेटर हेडवर कोरोना अहवाल निगेटिव्ह लिहून तो रुग्णाला सोपवला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
जेव्हा रुग्ण रमेश खबरानी यांचा खरा अहवाल आला तेव्हा समजलं की ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
या प्रकरणी अहवालात अफरातफरी, जागतिक महामारी कायद्याचं उल्लंघन, कंपनीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अब्दुल साजिद खानला अटक केली. सोबतच या प्रकरणात आणखी कोण कोण सामील आहेत, याचाही तपास पोलीस करत आहेत.