ठाणे : महापालिका क्षेत्रात सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असणाऱ्या ठिकाणीच निर्बंध घालण्यात आले असून शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आलेला नाही तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे प्रसिद्धी पत्रक काढण्याची वेळ आज ठाणे महापालिकेवर आली आहे. कारण काल ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी काढलेल्या नव्या लॉकडाऊनच्या पत्रकामुळे अनेक गोंधळ आणि भीती पसरली होती. आज मात्र हा निर्णय मागे घेत असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
काल काढलेल्या पत्रकात ठाणे महानगरपालिकेत, हॉटस्पॉट तयार करण्यात आले असून, या हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन असेल, तर इतर ठिकाणी मिशन बिगीन अगेनचे नियम लागू असतील असे सांगण्यात आले होते. आज मात्र टीका झाल्याने आणि वरिष्ठ पातळीवरून विचारणा झाल्याने पालिका प्रशासनाला हे पत्रक मागे घेण्याची वेळ आली आहे. हॉटस्पॉटमध्ये देखील सर्व कारभार सुरु राहतील, केवळ मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करून एखाद्या बिल्डिंग किंवा चाळीत निर्बंध लावले जातील असे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितले आहे.
सध्या महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाय योजना करण्यात येत आहेत. ज्या परिसरात कोरोनाचा संसर्ग जास्त आहे त्या परिसरात हॅाटस्पॅाटची निर्मिती करण्यात आली आहे. या हॅाटस्पॅाट क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कोविड-19 चे रूग्ण सापडले आहेत. त्या ठिकाणी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. या सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्येच निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग आहे ती इमारत, त्या इमारतीमधील मजला तिथेच 31 मार्च 2021 पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणचे सर्व व्यवहार यापूर्वी जसे सुरु होते त्यानुसार सुरु राहतील असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आला नसून ज्या आस्थापना सुरु आहेत. त्या आस्थापना यापुढेही सुरु राहणार आहेत. तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.