Tata Memorial Hospital : टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या (Tata Memorial Hospital) 11 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. डायग्नोसिस सेंटर चालवणाऱ्यांशी संगनमत करुन रुग्णांना चाचणीसाठी खासगी डायग्नोसिस सेंटरमध्ये पाठवल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवर करण्यात आला आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या एकूण 21 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, हवालदार, वॉर्ड बॉय, शिपाई तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
वेटींग लिस्टची भीती दाखवून रुग्णांना खासगी डायग्नोसिस सेंटरमध्ये वैद्यकीय चाचण्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप कर्मचाऱ्यांवर करण्यात आला आहे. याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात भा दं वि कलम 409, 406, 420 आणि 120(ब) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कशा प्रकारे चालत होता टाटा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना लुटण्याचा प्रकार
मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये मुंबई तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर भारतातील विविध राज्यातून रुग्ण उपचारासाठी दररोज येत असतात. टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना विविध वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात. पण वैद्यकीय चाचण्या देखील रुग्णालयात तात्काळ उपलब्ध असतानाही त्यासाठी खूप वेळ किंवा काही दिवस लागतील असे सांगून त्यांना खासगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये चाचणी करण्यास भाग पडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे एक रॅकेट उघडकीस आले आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयातील सुरक्षा अधिकारी अनिल भोसले यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ चारचे उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भोईवाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वेगवेगळया डाग्नोसिस सेंटर चालविणाऱ्यांशी संगनमत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जुलैपासून टाटा मेमोरियल रुग्णालयातील सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, हवालदार, वॉर्ड बॉय, शिपाई, आया आणि सफाई कर्मचारी या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ते लोकसेवक असूनही त्यांचे शासकीय कर्तव्य योग्यरीतीने पार पाडले नाही. कोणताही कायदेशीर अधिकार नसताना त्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेगवेगळया डाग्नोसिस सेंटर चालविणाऱ्यांशी संगनमत करुन गुन्हेगारी कट रचून रॅकेट चालवत होते. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना विविध वैद्यकीय चाचण्या टाटा रुग्णालयात तात्काळ उपलब्ध असतानाही केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खूप वेळ, काही दिवस लागतील असे सांगून त्यांना खासगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये चाचणी करण्यास भाग पाडले.
अशा प्रकारे आरोपींनी टाटा रुग्णालयातील रुग्णांची तसेच शासनाची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भादंवि कलम 409, 406, 420 आणि 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल करुन भोईवाडा पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सूनवल्याचे पोलिसांनी सूत्रांनी सांगितले.