Mumbai: अमली पदार्थांची (Drugs) तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई एनसीबीच्या पथक (Narcotics Control of Bureau) अलर्ट मोडमध्ये आहे. अमली पदार्थांविरोधात एनसीबीनं मुंबईत गेल्या दोन दिवसांत आठ कारवाई केल्या आहेत. भारतातून मोठ्या प्रमाणात परदेशात अमदी पदार्थांची तस्करी केली जात असल्याची माहिती मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी दिलीय. "गेल्या दोन दिवसांपासून आमची टीम मुंबईला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. या दोन दिवसांत एनसीबीनं मोठी कारवाई केलीय. या कारवाईत 2.296 किलो अॅम्फेटामाइन, 3.906 किलो अफू आणि 2.525 किलो झोल्पीडेमच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाई दरम्यान एनसीबीनं आफ्रिकन नागरिकाला ताब्यात घेतलंय", अशीही त्यांनी माहिती दिलीय.


समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीनं सर्वाधिक कारवाई अंधेरी परिसरात केल्या आहेत. पहिल्या कारवाईत 490 ग्रॅम अॅम्फेटामाइन जप्त करण्यात आलं होतं. हे ड्रग्ज स्टेथोस्कोपमध्ये लपवून ऑस्ट्रेलियाला पाठवले जात होते. दुसऱ्या कारवाईत 3.906 किलो अफू जप्त करण्यात आलं, जे मायक्रोवेव्हमध्ये लपवून मालदीवमध्ये पाठवली जाणार होतं. तिसर्‍या कारवाईदरम्यान एनसीबीनं अंधेरी परिसरातून 2.525 किलो झोल्पीडेमच्या टॅबलेट जप्त केल्या, ज्या खाद्यपदार्थांमध्ये लपवून यूएसएच्या टेनेसी येथे पाठवले जाणार होते.


चौथ्या आणि पाचव्या कारवाईत, एनसीबीनं एकूण 941 ग्रॅम (495+446) अॅम्फेटामाइन जप्त केलं, ऑस्ट्रेलियाला पाठवले जाणार होते. सायकलच्या हेल्मेट आणि बांगड्यांमध्ये लपवले होते. सहाव्या आणि सातव्या कारवाईत एनसीबीनं एकूण 848 ग्रॅम (458+390) अॅम्फेटामाइन जप्त केलं, जे डोंगरी भागातून दुबई आणि न्यूझीलंडला रबरच्या नळीत आणि टॉय बॉक्समध्ये लपवून पाठवले जाणार होते. एनसीबीनं आठवी कारवाई अंधेरी परिसरात केली. ज्यात 1 टीबी हार्डडिस्कमध्ये लपवून 17 ग्रॅम ऍम्फेटामाइनची तस्करी केली जात होती, जे अंधेरीहून स्वित्झर्लंडला पाठवली जाणार होती.


नवीन वर्षाच्या तोंडावर एनसीबी अलर्ट मोडवर आहे. अमली पदार्थांना आळा घालण्यासाठी तसेच त्याची तस्करी रोखण्यासाठी एनसीबी प्रयत्नशील आहे, असे समीर वानखेडे यांनी म्हटलंय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha