मुंबई : फालतू सेक्युलरवादाच्या छंदात अडकून पडलेल्या काँग्रेसला राहुल गांधींनी नवा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. राजस्थानमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी हिंदू म्हणजे सत्य व हिंदुत्व म्हणजे सत्ता असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचे शिवसेनेने समर्थन केले आहे. तसेच मुस्लीमांच्या मतांसाठी फालतू लांगूलचालन न करणाऱ्या शिवसेनेला मुस्लिम समाजाने आपले मानावे हा काँग्रेससारख्या सेक्युलर पक्षासाठी चिंतनाचा विषय असल्याचेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. मुस्लीम आणि दलितांच्या रोकडामुळे काँग्रेसचा वाडा चिरेबंदी, वैभवशाली वाटत होता. आज ही दोन्ही खणखणीत नाणी काँग्रेसच्या हातातून सुटली, त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशसह पश्चिम बंगालमधून काँग्रेसची घसरण झाल्याचे सेनेने म्हटले आहे.
राजस्थानमधील जयपूरमध्ये काँग्रसने देशातील महागाईविरोधात मेळावा घेतला होता. यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी गांधी हिंदू तर गोडसे हिंदुत्ववादी अशी फोड करुन चर्चा केली होती. हिंदू हूँ, हिंदुत्ववादी नही हूँ, सत्याग्रही हूँ, सत्ता-ग्रही नहीं, गांधी हूँ, गोडसे नही! असे राहुल गांधी म्हणाले होते.
हे हिंदू संस्कृतीत बसत नाही
सेक्युलरवाद म्हणजे हिंदूना लाथ व मुसलमानांचे ऊठसूट लांगूलचालन ही भूमिका योग्य नसून, हा देश सगळ्यांचा आहे. या देशाचा धर्म हिंदू आहे, पण येथे सर्व धर्म गुण्यागोविंदाने देशाचे नागरिक म्हणून राहू शकतात. मातृभूमिला वंदन करणारा, देशासाठी त्यागास तत्पर असलेला मुसलमान हा भारतमातेचा पुत्र आहे. हा विचार म्हणजेच राष्ट्रवाद आणि निधर्मीवाद. शिवसेनेनं याच विचारांची कास धरल्याचे सामनात म्हटले आहे. महागाई वाढली, जगणे मुश्कील झाले, काहीतरी करा, असे जनता सांगते तेव्हा ' महागाई वाढलीय. काळजी करुन नका राममंदिराची उभारणी झालीच आहे. आता मथुरेतील मंदिराचे काम सुरू करतो अशी उत्तरे देणे हिंदू संस्कृतीत बसत नाही. कोणी काय व कसे खायचे यावर दंगली घडवून झुंड बळी घेणं हिंदू संस्कृतीत बसत नसल्याचे सामानात म्हटले आहे.
तेव्हा हिंदूंना सावत्रपणाची वागणूक मिळाली, काँग्रेस होरपळली
१९४७ साली धर्माच्या नावावर धर्माच्या नावावर देशाची फाळणी झाली. मुसलमानांसाठी त्यांचे हक्काचे पाकिस्तान निर्माण झाले. तेव्हा राहिलेला देश हा हिंदूचाच आणि हिंदूसाठी असे मानले तर काय चुकले? पण पहिल्यापासून निधर्मीवादाच्या नावाखाली हिंदूना सावत्रपणाची वागणूक त्यांच्या देशात मिळाली. हिंदूंना त्यांचे न्याय्य हक्क नाकारले. शंकराचार्यांपेक्षा जामा मशिदीच्या इमामांशी सलगी करण्यातच सेक्युलरवाद्यांना धन्य वाटू लागले. रामापेक्षा बाबरभक्तीत राज्यकर्ते लीन झाल्यावर लोकांच्या असंतोषाचा भडका उडाला व त्यात काँग्रेस होरपळल्याचे सामानातून म्हटले आहे.
महात्मा गांधी हिंदू संस्कृतीचे रक्षक
मोदी सरकारने बिनधास्तपणे तीन तलाक विरोधी कायदा करुन पीडित मुसलमान महिलांना दिलासा दिला. असे धाडसी निर्णय घेताना हिंदू किवा मुसलमान बघायचे नसते तर भूमिका घ्यावीच लागते असे म्हणत मोदी सरकारचं सामनात कौतुक करण्यात आलंय. महात्मा गांधी हे हिंदू संस्कृतीचे रक्षक होते. त्यांनी जागोजागी मंदिरांची उभारणी केली. त्यात त्यांना धार्मिक अध्यात्मवाद दिसला. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांविरुद्ध जणजागृती करण्यासाठी धार्मिक उत्सव सुरू केले. शिवजयंती व गणपची उत्सव त्यांनी घरातून सार्वजनिक ठिकाणी आणले.
देशातील हिंदूना डावलून कोणताही लढा निर्माण करता येणार नाही व पुढे नेता येणार नाही हे काँग्रेसच्या पुर्वजांनी जाणले होते. पण स्वातंत्र्यानंतर फालतू निधर्मीवादाचा जन्म झाला व हिंदूना आपल्याच देशात असह्य वाटू लागले. त्यामुळे हिंदू समाजाच्या मनात काँग्रेसविषयी एक अढी निर्माण झाली. काँग्रेसला फक्त मुसलमान व ख्रिश्चनांचे पडले आहे. अल्पसंख्याकांचे चोचले पुरवणे हेच काँग्रेसचे धोरण असल्याचा समज लोकांमध्ये घट्ट रुजला. तो दूर करावा लागेल, असेही सामनात म्हटले आहे.