मुंबई : मुंबई महापालिकेच्या शिपाई पदावरच्या दोन कर्मचा-यांनी उघडली पत्नींच्याच नावे कंपनी उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी नियमबाह्यपद्धतीने महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोट्यावधींची कंत्राटे मिळवली आहेत. महापालिकेकडून आता या कर्मचा-यांची आणि कंत्राट प्रक्रीयेची अंतर्गत चौकशी होत आहे.
महापालिकेच्या डी विभागातील दोन कामगारांनी आपल्या बायकोच्या नावाने कंपनी स्थापन करून पालिकेकडून कोरोना काळात कोट्यवधी रुपयांची कामे मिळवल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. मुंबई महापालिका अधिनियमानुसार पालिकेत नोकरीला असलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाला पालिकेची अशी कंत्राटे घेता येत नाहीत. परंतु या दोघांनी मात्र नियम धाब्यावर बसवत स्वत:च्या पत्नींच्या नावे कंपनी खोलून कोट्यवधींची कामे मिळवली आहेत.
मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागात चतुर्थश्रेणी शिपाई असलेले अर्जुन नराळे आणि मेंटेनन्स विभागातील शिपाई पदावरचे रत्नेश भोसले यांनी आपल्या पत्नींच्या नावे कंपनी सुरु केली आहे. अर्जुन नराळेची पत्नी अपर्णाच्या नावे असलेल्या श्री एंटरप्रायजेस आणि या कंपनीने गेल्या दीड वर्षात एक कोटी 11 लाख रुपयांची कामे मिळवली आहेत. तर रत्नेश भोसलेच्या पत्नी रिया भोसले यांच्या आर आर एंटरप्रायजेस आणि कंपनीला 65 लाख रुपयांची कामे मिळाली आहेत.
पालिकेच्या डी विभागात कोरोना काळात कुठलीही वस्तू लागली तरी त्या पुरवठा करण्याचे काम या दोन कंपन्यांनी केलंय. स्क्रू ड्रायव्हरपासून कॉम्प्युटर पार्टपर्यंत आणि टेबलपासून भाड्याने गाड्या देण्यापर्यंत सर्व काही पुरवठा या दोन कंपन्यांनी केला आहे. यात कोविड सेंटरमधील रुग्णांना लागणा-या ऑक्सिमीटर, इलेक्ट्रिक केटल, स्टीमर या वस्तुंचा पुरवठा देखील केलाय आहे.
चतुर्थश्रेणीतील दोन कामगार एवढं मोठं धाडस बड्या अधिका-यांच्या पाठिंब्याशिवाय करु शकत नाही अशी महापालिकेत चर्चा आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. मात्र, नेहमीसारखे या वेळीही छोटे मासे जाळ्यात अन मोठे मासे जाळ्याबाहेर असं होऊ नये ही अपेक्षा.
संबंधित बातम्या :