मुंबई : मुंबईतील म्हाडाच्या घरांची लॉटरी कधी असेल, याबाबतचा सस्पेंस अखेर संपला आहे. कारण जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हाडाच्या 800 घरांसाठी जाहिरात दिली जाणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिली.


मुंबई म्हाडासाठी दरवर्षी 31 मे पर्यंत लॉटरी निघते. पण अजूनही जाहिरात न आल्याने यावर्षी लॉटरी नसेल, असे अंदाज बांधले जात होते. मात्र यावर्षी उशीर झाला असला तरीही ऑगस्टमध्ये लॉटरी जाहिर केली जाईल, हे स्पष्ट करण्यात आलं आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'ने याबाबत वृत्त दिलं आहे.

ज्या घरांसाठी लॉटरी असेल, ती घरं गोरेगाव, सायन, मानखुर्द आणि मुलुंड या भागात आहेत. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर यादी जाहीर केली जाईल, असं म्हाडाकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबईत परवडणारी घरं घेणं प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांना म्हाडाच्या लॉटरीची प्रतीक्षा असते. मात्र म्हाडाची लॉटरी 800 घरांसाठी असणार आहे. त्यामुळे घरांची कमतरता भासण्याची दाट शक्यता आहे.