मुंबई : दोनच आठवड्यांपूर्वी हत्या झालेली नवोदित मॉडेल कृतिका चौधरी हिच्या घटस्फोटित पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निर्मात्याची फसवणूक केल्या प्रकणी 37 वर्षीय विजय द्विवेदीला अटक करण्यात आली आहे.

चित्रपट निर्मात्याची 55 लाखांना फसवणूक केल्याप्रकरणी विजयला शनिवारी अटक झाली आहे. एन्काऊण्टर स्पेशालिस्ट दया नायक यांनी विजयला बेड्या ठोकल्या. विजय हा काँग्रेसचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांचा मुलगा असल्याचं भासवून अनेकांकडून पैसे लाटायचा.

कृतिका चौधरीच्या हत्येमागे विजयचा हात आहे का, याचा तपासही आंबोली पोलिस करत आहेत. कृतिकाला विजय धमकावयाचा आणि त्रास द्यायचा, असा आरोप कृतिकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

अभिनेत्री कृतिका चौधरी हत्या प्रकरणाचं गूढ वाढलं!


कृतिकाचा मृतदेह 12 जून रोजी अंधेरीतील राहत्या घरी अर्धनग्नावस्थेत आढळला होता. त्यामुळे हत्येपूर्वी तिच्यावर जबरदस्ती झाली असावी, तसेच तिची हत्या 7 ते 8 जूनच्या दरम्यान झाली असावी, असा संशय वर्तवण्यात येतो आहे. या पार्श्वभूमीवर 7 आणि 8 तारखेच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

कृतिका सिनेक्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. आपल्या ग्लॅमरस लूक आणि अभिनयाच्या जोरावर कृतिका यशाच्या पायऱ्या चढत होती. मात्र, एखादा मोठा ब्रेक मिळण्याआधीच मृत्यूने तिचे स्वप्न धुळीस मिळवले.

कृतिका मुंबईतील अंधेरीत भैरवनाथ सोसायटीत पाचव्या मजल्यावर राहत होती. अगदी हसत-खेळत जगणारी कृतिका अचानक गायब झाली. फ्लॅटही बंद होता. मात्र, ती बेपत्ता झाल्याच्या पाच-सहा दिवसांनंतर बंद फ्लॅटमधून वास येऊ लागला आणि शेजाऱ्यांना शंका आली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर कृतिकाच्या हत्येची घटना समोर आली.