मुंबई: म्हाडाच्या (MHADA) मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मास्टर लिस्टवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील 265 पात्र भाडेकरू-रहिवाशी यांना सदनिकांचे वितरण करण्यासाठी मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते गुरूवारी पहिल्यांदा संगणकीय सोडत काढण्यात आली.
              
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी शंभरकर म्हणाले की, या ऐतिहासिक निर्णयामुळे बृहतसूचीवरील सदनिका वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान झाली असून सदनिका वितरणाच्या प्रक्रियेत सुसूत्रता येणार असून भाडेकरू/रहिवाशी यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहेत. बृहतसूचीवरील (मास्टर लिस्ट) जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरू/रहिवाशी यांना पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळी सदनिकांचे वितरण  संगणकीय सोडतीद्वारे होत असून वर्षानुवर्षे संक्रमण गाळ्यात राहणार्‍या भाडेकरू/रहिवाशी यांना मुंबईच्या हृदयस्थानी आपले हक्काचे घर मिळाले असून यात आनंद असल्याचे ते म्हणाले. 


म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार, मार्गदर्शनाखाली जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील पात्र भाडेकरू / रहिवाशी यांना बृहतसूचीवरून सदनिका वितरण करण्यासाठीची नियमावली निश्चित करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील परिपत्रक 22 डिसेंबर, 2023 रोजी जारी करण्यात आले. बृहतसूचीवरून भाडेकरू / रहिवाशी यांना सदनिका वितरणाच्या धोरणाचा भाग म्हणून यापूर्वीचे प्राधिकरणाचे ठराव, परिपत्रके, आदेश रद्द, अधिक्रमित, सुधारित करून त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन नियमावलीनुसार निवासी गाळा वितरणाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून निवासी गाळ्यांचे वितरण संगणकीय प्रणालीने करण्याचा निर्णय घेऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जात असल्याचे शंभरकर म्हणाले.  
           
एकूण उपलब्ध 444 सदनिकांसाठी बृहतसूचीवरील पात्र 265 भाडेकरू/ रहिवाशी यांच्यासाठी आज संगणकीय सोडत काढण्यात आली. बृहतसूचीवरील पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना  सदनिका वितरित करण्यासाठी ठरविण्यात आलेल्या निकषानुसार 300 चौरस फूटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारक 18 पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना त्यांच्या मागणीनुसार 450 चौरस फूट वाढीव क्षेत्रफळाची सदनिका देण्यात आली.  300 चौरस फूट क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारक 52 पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना त्यांच्या विनंतीनुसार 300 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य वितरित करण्यात आली. या गटात 108 सदनिका वितरणासाठी उपलब्ध होत्या.   
          
300 चौरस फूट क्षेत्रफळापेक्षा कमी आकारमानाच्या 172 जुन्या पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना 301 ते 400 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित करण्यात आली.  301 ते 400 चौरस फूट क्षेत्रफळाच्या 10 जुन्या पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना 401 ते 500 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित करण्यात आली. या गटात 82 सदनिका वितरणासाठी उपलब्ध होत्या. 401 ते 500 चौरस फुट क्षेत्रफळाच्या 5 जुन्या सदनिकाधारक पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना 500 ते 600 चौरस फुट क्षेत्रफळाची सदनिका वितरित करण्यात आली. 501 ते 600 चौरस फूट क्षेत्रफळाच्या 5 जुन्या पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना 601 ते 700 चौरस फुट क्षेत्रफळाची सदनिका वितरित करण्यात आली.  601 ते 753 चौरस फूट क्षेत्रफळापेक्षा अधिक आकारमानाच्या 7 पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना 22 डिसेंबर 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार 753 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित करण्यात आली.
              
यावेळी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता सुनील जाधव, मुख्य अभियंता शिवकुमार आडे, उपमुख्य अधिकारी अनिल वानखेडे, मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर, उपमुख्य अधिकारी श्रीमती विराज मढावी, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीमती वैशाली गडपाले, मुख्य माहिती आणि संचार तंत्रज्ञान अधिकारी श्रीमती सविता बोडके आदी उपस्थित होते.           
            
सदर परिपत्रकानुसार ज्या पात्र भाडेकरू/रहिवाशी यांना 300 चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या सदनिकांचे वाढीव शुल्क भरणे शक्य आहे, अशा अर्जदारांसाठी उपरोक्त नमूद परिपत्रकात विशेष तरतूद करण्यात आली आहे. विशेष तरतुदीनुसार ज्या पात्र भाडेकरू /रहिवाशी यांना 300 चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या सदनिकांचे वाढीव शुल्क भरणे शक्य नाही, अशा अर्जदारांनी म्हाडाकडे तसा विनंती अर्ज सादर करावा. अर्जदारांची निष्काषन सूचना दिनांकानुसार ज्येष्ठता यादी तयार करून उपलब्ध गाळ्यांच्या प्रमाणात सोडत पद्धतीने 300 चौरस फूट गाळ्यांचे वितरण विनाशुल्क करण्यात येणार आहे.             
             
मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरू/ रहिवाशी यांना निष्कासन सूचना (व्हेकेशन नोटीस) देऊन इमारत खाली करण्यात आली आहे व त्यांच्या मूळ इमारतीचा अरुंद भूखंड, आरक्षण, रस्ता रुंदीकरण या कारणामुळे पुनर्विकास शक्य नाही. तसेच उपकरप्राप्त इमारती पुनर्रचित झाल्या आहेत, मात्र कमी गाळे बांधले गेले आहेत अशा वंचित मूळ भाडेकरू/ रहिवाशी यांना यापूर्वी मंडळाद्वारे पुनर्रचित / पुनर्विकसित इमारतीमध्ये कायमस्वरूपी गाळा देण्यात आलेला नाही व त्यांचे वारसदार संक्रमण शिबिरात किंवा इतर ठिकाणी राहत आहेत अशा बृहतसूचीवरील 265 पात्र मूळ भाडेकरू / रहिवाशी अथवा त्यांचे वारसदार यांची आज संगणकीय सोडत काढण्यात आली.  


22 डिसेंबर, 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार निश्चित नियमावलीनुसार बृहतसूचीवरील भाडेकरू/रहिवाशांकडून आलेल्या अर्जावर, दावे/हरकतीवर निर्णय घेऊन वितरण यादी अंतिम करण्यासाठी पाच सदस्यीय समिति गठित करण्यात आली आहे. समितीने आदेश दिल्यानंतर  हरकती व सूचनांकरिता सात दिवसांच्या कालावधीकरिता म्हाडाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बृहतसूची समितीने अर्जदारांची पात्रता सिद्ध केल्यानंतर निष्कासन सुचनेच्या दिनांकाच्या ज्येष्ठतेप्रमाणे यादी तयार करण्यात येणार आहे. बृहतसूची समितीच्या सुनावणीचा निर्णय म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.   
              
विकास नियंत्रण नियमावली 33 (7) व 33 (9) अंतर्गत ना हरकत प्रमाणपत्रांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या सदनिकांची यादी बृहतसूचीवरील भाडेकरू / रहिवाशी यांना वितरणासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.                 
            
संगणकीय सोडतीसाठी सदनिकांच्या उपलब्धतेनुसार पात्र अर्जदारांची संख्या त्यांच्या निष्कासन सुचनेच्या तारखेच्या ज्येष्ठतेनुसार निश्चित करण्यात येणार आहे. भाडेकरू / रहिवाशी यांची पात्रता निष्कासन सूचनेच्या आधारे निश्चित झाल्यानंतर सोडतीत सदनिका विजेता घोषित झाल्यावर अर्जदाराने सदनिका नाकारल्यास अर्जदारास सदनिका घेण्यात स्वारस्य नसल्याचे मानून त्याचा बृहतसूचीवरील हक्क संपुष्टात येणार आहे. संगणकीय सोडतीनंतर अर्जदाराने 15 कार्यालयीन दिवसांच्या आत उपमुख्य अधिकारी, पुनर्रचित गाळे विभाग यांच्याकडे स्वीकृती पत्र सादर करणे गरजेचे आहे. सदर स्वीकृती पत्र 15 दिवसांच्या आत सादर न झाल्यास भाडेकरू / रहिवाशी यांना या सदनिकमध्ये स्वारस्य नसल्याचे गृहीत धरून बृहतसूचीवरील हक्क संपुष्टात येणार आहे.    
             
अर्जदाराने देकारपत्र प्राप्त झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत देकारपत्रातील नमूद अटी व शर्तींची पूर्तता करून ताबा घेणे बंधनकारक असून तसे न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता सदनिकेचे वितरण रद्द होणार असून बृहतसूचीवरील हक्क संपुष्टात येणार आहे.   
            
बृहतसूचीवरील पात्र अर्जदारांना सदनिका वितरित करण्यासाठी निकष ठरविण्यात आले असून 300 चौरस फूटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारकाला 300 ते 400 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित केली जाणार आहे. 301 ते 400 चौरस फूट क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारकाला 400 ते 500 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित केली जाणार आहे. 401 ते 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारकाला 500 ते 600 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित केली जाणार आहे. 501 ते 600 चौरस फूट क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारकाला 600 ते 700 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित केली जाणार आहे. 601 ते 700 चौरस फूट क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारकाला 700 ते 753 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित केली जाणार आहे. तसेच 701 व त्यावरील जुन्या सदनिकाधारकाला 753 चौरस फूट क्षेत्रफळापर्यंत  सदनिका वितरित केली जाणार आहे.
           
गाळे वाटपाच्या धोरणात बदल करण्यात आला असून नवीन धोरणानुसार मूळ गाळ्याच्या क्षेत्रफळापेक्षा अतिरिक्त क्षेत्रफळाचा गाळा लाभार्थ्यांना देण्याची तरतूद आहे. मूळ गाळा निशुल्क असून अतिरिक्त क्षेत्रफळाकरिता चालू आर्थिक वर्षाच्या रेडिरेकनर दराच्या 125 टक्के दराने अधिमूल्याची आकारणी करून वितरित करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद आहे.


ही बातमी वाचा: