Mumbai Metro Line 2A and 7 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईतील मेट्रो दोन अ आणि मेट्रो 7 या दोन्ही मार्गिकाचे लोकार्पण केले होते. मात्र आजपासून या दोन्ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. या मार्गिका सुरू झाल्याने आता पश्चिम उपनगरात पूर्व आणि पश्चिमेला मेट्रो मार्गिका उपलब्ध झाल्या आहेत. तसेच या दोन्ही मार्गिका मेट्रो वन सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बस आणि लोकलमधून होत असलेला अतिशय त्रासदायक आणि क्लेशदायक असा प्रवास आता करावा लागणार नाही. कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 60 रुपये असे तिकिटांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
पश्चिम रेल्वे वरील प्रचंड गर्दी त्याचप्रमाणे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि लिंक रोड वरील दिवस रात्र होत असलेले ट्राफिक जाम यातून आता पश्चिम उपनगर वासियांना दिलासा मिळणार आहे. कारण डी एन नगर पासून ते दहिसर पर्यंत आणि गुंदवली पासून दहिसर पूर्व पर्यंत मेट्रोच्या दोन अ आणि सात या मार्गिका सुरू झाले आहेत. आज संध्याकाळी चार वाजल्यापासून प्रवाशांसाठी या मेट्रो मार्गिका खुल्या करण्यात आल्या. या मार्गिका सुरू झाल्याने आता मुंबईत एकूण अंदाजे 45.51 किमी लांबीची मेट्रो मार्गिका सेवेत असणार आहेत. ‘मेट्रो 2 अ’ मार्गिकेवरून दहिसर – अंधेरी पश्चिम, डी. एन. नगर प्रवास ४० मिनिटांमध्ये करता येणार आहे. तर ‘मेट्रो ७’ मार्गिकेवरून दहिसर ते गुंदवली, अंधेरी पूर्व प्रवास 35 मिनिटांमध्ये करता येणार आहे. शुक्रवारपासून संपूर्ण मार्गावर २२ मेट्रो गाड्या धावणार आहेत. एका गाडीची प्रवासी क्षमता दोन हजार 308 व्यक्ती इतकी आहे. देशी बनावटीच्या मेट्रो गाड्या स्वयंचलित आहेत. त्यांचा ताशी वेग 80 कि.मी. इतका आहे. मात्र त्या ताशी 70 किमी वेगाने धावणार आहेत. प्रत्येक मेट्रो स्थानकावर कमीत कमी 55 सीसीटीव्ही कॅमेरे, महिलांसाठी ‘103’ हेल्पलाईन क्रमांक, पहिल्या टप्प्याच्या संपूर्ण मार्गातील स्थानकात एकूण 103 सरकते जिने, 68 उद्वाहकांची व्यवस्था करण्यात आली आहे. एन सी एम सी हे कार्ड वापरून आपण कोणत्याही मेट्रो मधून दुसऱ्या मेट्रोमध्ये जाऊन प्रवास करू शकणार आहोत.
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड या सुविधेचे उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महा मुंबई मेट्रो यांच्याकडून संयुक्तिकरित्या ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या एनसीएमसी कार्डचा वापर करून आपण भारतातल्या कोणत्याही मेट्रो मार्गांवर प्रवास करू शकणार आहोत. सध्या मुंबईतल्या मेट्रो दोन अ आणि मेट्रो सेवन या दोन्ही मार्गीकांवर यावा कारचा वापर करून प्रवास करता येणार आहे तर येत्या काही दिवसात मेट्रो वन वर देखील हे कार्ड चालू शकणार आहे. भारत सरकारच्या प्रयत्नानुसार भविष्यात या एकाच कार्डचा वापर करून बस मेट्रो आणि लोकलमध्ये देखील प्रवाशांना प्रवास करता येईल.