Mumbai Metro : मुंबई मेट्रोमध्ये(Mumbai Metro) 1 मे पासून 65 वर्षांवरील नागरिक, 'दिव्यांग' व्यक्ती आणि इयत्ता 12 वी पर्यंतचे विद्यार्थी यांना मेट्रोच्या तिकीट दरांत सवलत मिळणार आहे. मेट्रोच्या तिकीट दरांत 25 टक्के सवलत मिळणार असून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शनिवारी ही माहिती दिली. 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' च्या हजारो धारकांना देखील ही सवलत दिली जाणार आहे. 'मुंबई वन' म्हणजेच, वर्सोवा ते घाटकोपर या मार्गिकेवरील पासवर 45 किंवा 60 टक्के सवलत दिली जाणार आहे.


1 मे हा महाराष्ट्र दिन आहे आणि त्यानिमित्ताने 65 वर्षांवरील नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील मुंबई मेट्रोच्या प्रवासातील सवलतीची भेट मिळाली आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) कडून मुंबईकरांसाठी ही भेट असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे. त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे. तर महिलांनासुद्धा एसटी बसेसमधून 50 टक्के तिकीट दरांत सवलत दिली आहे. सामाजिक भावनेतून हा निर्णय घेतला आहे. मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.


योग्य कागदपत्र दाखवणे आवश्यक 


मेट्रो 2 अ  दहिसर पूर्व आणि अंधेरी पश्चिम मधील डीएन नगरला जोडते, तर लाईन 7 अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्व दरम्यान धावते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी, अपंग व्यक्तींना वैद्यकीय किंवा अपंगत्वाचे सरकारी प्रमाणपत्र यांसारखी वैध कागदपत्रे सादर करावी लागतील, तर ज्येष्ठ नागरिकांना वयाचा दाखला द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना सवलतीसाठी पात्र होण्यासाठी शाळेच्या ओळखपत्रासह त्यांचे किंवा त्यांच्या पालकांचे पॅनकार्ड दाखवावे लागेल.


ही कागदपत्रे लाईन 2अ आणि मार्ग 7 वरील कोणत्याही तिकीट खिडकीवर नागरिक दाखवू शकतात. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्यांच्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य परिवहन बसमध्ये प्रवास मोफत केला आहे, तर महिलांना बस तिकीट दरात देखील 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच आता मुंबईकरांना मेट्रोच्या सवलतीची भेट देण्यात आली आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maharashtra Din : मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना केलं अभिवादन, महाराष्ट्र दिनाच्या जनतेला दिल्या शुभेच्छा