मुंबई : मुंबई मेट्रो- 3 साठीच्या कारशेडची जागा लवकरच निश्चित होण्याची शक्यता आहे. मेट्रो कारशेडसाठी नवी जागा शोधण्याची जबाबदारी असलेल्या मुख्य सचिवांच्या समितीचा आज पाहणी दौरा पार पडला. मुख्य सचिव संजय कुमारांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण 9 सदस्यीय समितीनं आज मेट्रो कारशेडची जागा निश्चित करण्यासाठी पाहणी दौरा केला. पुढील आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.


कांजुरमार्ग, आरे, कलिना आणि बीकेसीच्या प्रस्तावित जागांचा यावेळी आढावा घेण्यात आला. मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडला पर्यायी जागा सुचवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती राज्य सरकारला मेट्रो कारशेडच्या जागेबाबत शिफारस करणार आहे.


समितीत कोण कोण आहेत?


मेट्रो कारशेडसाठी नवी जागा शोधण्यासाठीच्या समितीत मुख्य सचिव संजय कुमार, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, मुंबई महापालिका आयुक्त, कोकणचे विभागीय आयुक्त, परिवहन आयुक्त, मुंबई मेट्रोचे सहव्यवस्थापकीय संचालक, आयआयटी मुंबईचे प्रा. के. व्ही. कृष्णा राव, डायरेक्ट वर्क्स मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे प्रमोद आहुजा आणि अतिरिक्त महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सोनिया सेठी यांचा समावेश आहे.


समितीची जबाबदारी काय आहे?




  • आरे येथील यापूर्वी मेट्रो 3 कारशेड डेपोसाठी प्रस्तावित केलेला आराखडा पुरेसा आहे किंवा आणखी जमीन किंवा वृक्षतोड करण्याची आवश्यकता भासेल का? याबाबतची तपासणी करणे.

  • मेट्रो तीन आणि सहा यांच्या मार्गिकेचे एकत्रीकरण सुलभ करणे शक्य आहे का? यासाठी अंदाजित खर्च आणि कालावधी या बाबी तपासणे.

  • कांजूरमार्ग येथील जागा आरेपेक्षा सुयोग्य आहे का? याची तपासणी करणे.

  • मेट्रो 3, 4 आणि 6 यांच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथे जागा पुरेशी आणि सुयोग्य आहे का? याचा तपास करणे या बाबींचा सविस्तर अहवाल समिती राज्य सरकारला सादर करणे.


मेट्रो कारशेडसाठीची तिसरी समिती


कारशेडसाठी आतापर्यंत माजी मुख्य सचिव यू. पी. एस. मदान, अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नेमल्या होत्या. त्यानंतर पुन्हा मुख्य सचिव संजय कुमारांची नवीन समिती नेमण्यात आलीय. मेट्रो कारशेड प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. उच्च न्यायालयाने कांजूर जमीन हस्तांतरणास स्थगिती देऊन कारशेडच्या कामासही मनाई केल्याने सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात आता नवी समिती कोणती जागा सुचवणार, याबाबत उत्सुकता आहे.