मुंबई : मुंबई मेट्रो 3च्या भुयारीकरणाचं 50 टक्के काम पूर्ण झालं आहे. अवघ्या 19 महिन्यांमध्ये मेट्रो प्राधिकरणाने 50 टक्के भुयारीकरणाचा टप्पा पार केला आहे. या मार्गासाठी एकूण 56 किमी (अप आणि डाऊन)चे भुयारीकरण करायचे आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ हा मुंबईच नव्हे तर भारतातील सर्वात लांब संपूर्णत: भुयारी मेट्रो मार्ग आहे.  भुयारीकरणाप्रमाणे खोदकाम, बेस स्लॅब, कॉनकोर्स स्लॅब, कॉलम तसेच भिंतींची बांधणी यासारखी कामे देखील युद्धपातळीवर सुरु आहेत.

या भुयारीकरणाच्या कामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला अनेक वादांना तोंड द्यावं लागलं होतं. पूर्णपणे जमिनीखालून जाणाऱ्या मेट्रो 3 मार्गिकेवर एकूण 27 थांबे असणार आहेत. या प्रकल्पाच्या एकूण 56 किलोमीटर भुयारीकरणाच्या कामापैकी जवळपास 50 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Mumbai Metro 3 | अवघ्या 19 महिन्यांत मुंबई मेट्रो 3च्या भुयारीकरणाचं 50 टक्के काम पूर्ण | ABP Majha



येथे झाले भुयारीकरणाचे 13 टप्पे

  • सप्टेंबर 2017 मध्ये नयानगर लॉचिंग शाफ्टमध्ये कृष्णा-1 हे टीबीएम उत्तरविल्या नंतर दिनांक 6 नोव्हेंबर 2017 पासून प्रत्यक्ष भुयारीकरणाला सुरुवात झाली.

  • मुंबईच्या भूगर्भात एकूण 17 टीबीएम्स सध्या कार्यरत आहेत.

  • भुयारीकरणाचा पहिला टप्पा सप्टेंबर 2018 रोजी पार पडला त्यानंतर केवळ 8 महिन्यात एकूण 12 टप्पे पार पडले आहेत.

  • आतापर्यंत सीप्झ येथे 1, सीएसएमआयए-टी 2 येथे 2, सहार, एमआयडीसी, वरळी आणि आंतरदेशीय विमानतळ येथे प्रत्येकी एक तर दादर, विद्यानगरी आणि विधानभवन येथे 2 अशा प्रकारे भुयारीकरणाचे एकूण 13 टप्पे पार पडले आहेत.

  • टीबीएम्स भूगर्भात उतरविण्यासाठी कफ परेड, इरॉस सिनेमा, आझाद मैदान, सायन्स म्युझियम, सिद्धिविनायक, नयानगर, बिकेसी, विद्यानगरी, पाली मैदान, सारिपुत नगर, सहार रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी 2 येथे लॉचिंग शाफ्ट बांधण्यात आले आहेत.

  • एकूण भुयारीकरणापैकी आजवरचा सर्वात मोठा भुयारीकरणाचा टप्पा विद्यानगरी ते आंतरदेशीय विमानतळ (3.9किमी) हा असून सर्वात लहान सारिपुत नगर ते सीप्झ (562मीटर) हा आहे.

  • 28 किमी भुयारीकरणासाठी एकूण 19495 सेगमेंट रिंग्सचा वापर झाला आहे. हे सेगमेंट रिंग्स मुंबईतील 6 कास्टिंग यार्ड मध्ये तयार होत आहेत ज्यापैकी 4 वडाळा, 1 माहुल तर 1 जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथे आहे.