Mumbai Measles Disease : गोवर लसीची पहिली मात्रा नऊ महिने पूर्ण झालेल्या बाळांनाच दिली जाते. मात्र मुंबईत (Mumbai) लसपात्र वयापूर्वीच बाळांना गोवरची (Measles) लागण होत असल्याचं समोर आलं आहे. सर्वाधिक आठ महिन्यांच्या बाळाला गोवरची बाधा झाली आहे. मुंबईत आढळून आलेल्या 169 बालकांपैकी 157 रुग्ण हे लस घेण्यास पात्र नसलेल्या म्हणजेच शून्य ते आठ महिने वयोगटातील आहेत. त्यामुळे नवजात बालकांबद्दल चिंता वाढू लागली आहे.
मुंबईत गोवरची लागण झालेल्या बालकांची संख्या 169 एवढी आहे. त्यापैकी 0-8 महिने वयोगटातील बालकांना मोठ्या प्रमाणात गोवरची लागण झाली आहे. गोवरची लस ही प्रामुख्याने नऊ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात येते. नवव्या महिन्यात एमआर 1 आणि सोळाव्या महिन्यात एमएमआर लस दिली जाते. परंतु मुंबईत गोवरची बाधा झालेली सर्वाधिक बालकं ही 0-8 महिने वयोगटातील आहेत. अशावेळी काय करावं, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
दरम्यान, महापालिकेकडून अ जीवनसत्त्व दिलं जात आहे. त्याचप्रमाणे बालकांना स्तनदा मातांकडून अँटीबॉडीज मिळत असतात. त्यामुळे 0-8 महिने वयोगटातील बाळाला सध्या लस मिळाली नाही तरी फारसा धोका नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र काल (17 नोव्हेंबर) मुंबईत सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. गोवर लसीसाठी पात्र वय नसल्यामुळे तिला लस मिळाली नव्हती. त्यामुळे लसपात्र वयामध्ये बसत नाही त्या बाळांनाच गोवरची बाधा झाली असून धोका असल्याचं या घटनांवरुन दिसत आहे.
गोवर आजाराची कारणे
गोवर हा आजार Paramyxovirus च्या संसर्गामुळे होतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर साधारण 10 ते 12 दिवसात गोवरची लक्षणे जाणवू लागतात. गोवर आजाराने संक्रमित व्यक्ती खोकला किंवा शिंकला तर त्यामधून विषाणू हवेत पसरतात आणि या विषाणूच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना गोवर आजार होतो.
गोवरचे लक्षणे
- सुरुवातीला खोकला, ताप, सर्दी होणे
- डोळ्यांची जळजळ होणे
- डोळे लाल होणे
- घसा दुखणे
- तोंडाच्या आतील बाजूला पांढऱ्या रंगाचे स्पॉट जाणवणे
- अंग दुखणे
- ही लक्षणे सुरुवातीला जाणवतात. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी चेहऱ्यावर आणि मग पोट तसंच पाठीवर लालसर बारीक पुरळ उठतात.
गोवर आजारावरील उपचार
गोवर आजारावर विशेष उपचार केले जात नाही. रुग्णांमधील लक्षणांवरुन उपचार केले जातात, जसं की ताप, सर्दी, खोकला असल्यास त्यावरील औषध दिलं जातं. साधारणपणे 8 ते 14 दिवसात ताप कमी होऊन पुरळ सुद्धा कमी होतं. यावेळी रुग्णाने विश्रांती घेऊन हलका आहार घेणं आवश्यक आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत.
VIDEO : Mumbai Measles Infection : मुंबईत गोवरचा विळखा, नवजात बालकांबाबत चिंता