Maharashtra Political News : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी हिंदू देव-देवतांवर टीका केल्याचा आरोप मराठा युवा सेनेने केला आहे. दरम्यान हेच का तुमचं हिंदुत्व? असा सवाल विचारत मराठा युवा सेनेने सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात मुंबईत बॅनरबाजी केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मराठा युवा सेनेकडून शिवसेनाभवन, दादर परिसर, मराठा युवा सेना मुंबईचे प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज चौक चेंबूर परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारेंच्या विरोधात बॅनर झळकवण्यात आले आहेत.
ठाकरे गटाच्या फायरब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे सध्या राज्यभरात महाप्रबोधन यात्रेतून आपले विचार आणि मतं मांडत आहेत. त्यासाठी त्या राज्यभरातच्या दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण त्यापूर्वीही त्या त्यांच्या भाषणांमधून आपले विचार मांडत होत्या. अशातच राम आणि कृष्ण थोतांड आहे, मी राम आणि कृष्णाला मानणार नाही. ज्याच्या घरात लेकरू झालं त्यालाच माहीत नाही शंकर किती भोळा आहे, अशाप्रकारची वक्तव्य सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत यायच्या अगोदर केली होती, असा आरोप मराठा युवा सेनेने केला आहे.
पाहा व्हिडीओ : मराठा युवा सेनेची सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी
शिवसेनेत येण्यापूर्वी अतिशय गंभीर आणि खालच्या स्तराला जाऊन सुषामा अंधारेंनी हिंदू देवीदेवतांवर टिका केली होती. त्यावरुनच हेच का तुमच हिंदुत्व? असा सवाल आता मराठा युवा सेनेनं उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे यांना केला आहे.
मराठा युवा सेना आज सकाळी साडेअकरा वाजता शिवाजी मंदिर दादर या ठिकाणी पोलखोल पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेनंतर सुषमा अंधारेंविरोधात दादर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला जाणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला मराठा युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अभिवादन करणार आहेत.