मुंबई: मालाडमधील मैदानाला टिपू सुलतान क्रिडांगण असं नाव देण्याचं ठरलंच नाही. पण त्यावरुन भाजप मुंबईला अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई शांत आहे. जर दंगल घडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मग मैदानात या असं आव्हान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी भाजपला दिलं आहे. तसेच या मैदानाला राणी लक्ष्मीबाईंचे नाव देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. 


मालाडच्या मैदानाला टिपू सुलतान क्रिडांगण असं नाव देण्यात येत आहे असा आरोप करत बुधवारी भाजपने मुंबईत आंदोलन केलं होतं. आता त्यावर मुंबईच्या महापौरांनी भाजपला चांगलंच सुनावलं आहे. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "मुंबई स्थिर आहे, तिला अस्थिर करु नका. मैदानाला टिपू सुलतान असं नाव देण्याचं महापालिकेनं कधी ठरवलंच नाही. भाजपला या न झालेल्या गोष्टीवरुन मुंबई अस्थिर करायची आहे. कुणाला हवीय दंगल? दंगल घडवून तरी दाखवा, मग बघा..."


टिपू सुलतान यांचं नाव मुंबईतील मैदानाला या आधीही देण्यात आलं होतं. पण भाजप आता राजकारण करत असून मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे असा आरोपही त्यांनी केला. 


नेमकं प्रकरण काय?


मुंबईतील मालवणी भागातीव  एका मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यासंबंधी बातमी आली होती. राज्याचे मंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीमधून या मैदानाचे बांधकाम झालं आहे. मात्र, टिपू सुलतानने हिंदूंवर अत्याचार केला असून त्या व्यक्तीचं नाव या मैदानाला देऊ नये, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. यावरुन भाजपने काल मुंबईत अनेक ठिकाणी आंदोलन केली आणि राजकीय वातावरण चांगलच तापवलं. भाजपाने देखील मुंबईतल्या एका रस्त्याला ‘वीर टिपू सुलतान’ असं नाव दिलेलं आहे, असा दावा अस्लम शेख यांनी केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: