मुंबई: टिपू सुलतान प्रकरणावरुन सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुंबईतल्या एका मैदानाचं नाव टिपू सुलतान ठेवण्यावरून हे वादंग सुरू आहे. याप्रकरणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत सत्ताधारी शिवसेनेला टोला लगावला आहे. ही तर संधीसाधू सेना आहे. कॉंग्रेसने जन्माला घातली, मुस्लिम लीगच्या मांडीवर बसली असे ट्वीट केशव उपाध्ये यांनी करत सेनेवर टीका केली आहे. 


नेमकं काय म्हणाले उपाध्ये


ही तर संधीसाधू सेना..कॉंग्रेसने जन्माला घातली, मुस्लिम लीगच्या मांडीवर बसली, कॉंग्रेस (ओ) सोबत रमली, कॉंग्रेस (आय)शी दोस्ती केली, पीएसपीशी गाठ बांधली आणि सारे फसल्यावर हिंदुत्वाचा घोष करीत भाजपसोबत आली. आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना!” असं केशव उपाध्येंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


औरंगाबादचं संभाजीनगर करणं जमत नाही


याचबरोबर उपाध्ये यांनी औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्यावरुन देखील शिवसेनेवर निशाणा साधला. औरंगाबादचे संभाजीनगर करणं जमत नाही. हिंदुत्व फक्त गप्पांपुरतंच राहिलं. 1970 मध्ये मुस्लिम लीगसोबत गेले, आता टिपू सुलतान उद्घोष करत आहेत, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.


नेमकं प्रकरण काय?


मुंबईतील मालवणी भागात एका मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीमधून या मैदानाचे बांधकाम झालं आहे. मात्र, हिंदुंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचं नाव मैदानाला देऊ नये, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. तर, भाजपाने देखील मुंबईतल्या एका रस्त्याला ‘वीर टिपू सुलतान’ असं नाव दिलेलं आहे, असा दावा अस्लम शेख यांनी केला आहे. त्यानंतर आता शिवसेनेला खोचक टोला लगावताना केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: