Congress on Tipu Sultan Controversy : मुंबईतील मालाडमधील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याच्या मुद्यावरून आता राजकारण तापू लागले आहे. या उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यास भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. तर, भाजपच्या या विरोधाला आता काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले आहे. शहीद टिपू  सुलतान यांच्या नावाने सुरू असलेले घाणेरडे राजकारण हे भाजपाच्या विकृत विचारधारेचे निदर्शक असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे. 



भाजपसाठी 2013 मधील आणि 2022 टिपू सुलतान वेगळे असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले. मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावाच्या समर्थनासाठी दुथडी भरून भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. त्यावेळी कोणतीही निवडणूक नव्हती. आता निवडणूक आहे. या दुटप्पीपणाला काय म्हणावे असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला आहे. सचिन सावंत यांनी ट्वीटरवर आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी काही कागदपत्रेही ट्वीट केली आहेत.


 






सचिन सावंत यांनी भाजपा नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीवर गेले असताना अभ्यागत वहीत टिपू सुलतान यांच्याबाबत लिहिलेले मतही ट्वीट केले आहे. 







भाजपची आताची बदललेली संधीसाधू भूमिका ही सत्तेसाठी असल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे. आगामी निवडणुकीत विकासाचा रोडमॅप नसल्याने धर्मांधता, द्वेष व तिरस्कार पसरवणे हीच भाजपची कार्यपद्धती असल्याचे सावंत यांनी म्हटले. भाजपची ही कृती म्हणजे सत्तेसाठी निर्लज्जपणाचा कळस असल्याची बोचरी टीका सचिन सावंत यांनी केली. 


दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीदेखील टिपू सुलतानच्या वादावरून भाजपवर टीका केली आहे. राष्ट्रपतींनी टिपू सुलतानचे गुणगान केले होते. त्यामुळे आधी राष्ट्रपतींचा राजीनामा तुम्ही मागणार आहात का?  असा उलट प्रश्न राऊत यांनी भाजपला केला. टिपू सुलतानच्या नामकरणाचे काय करायचे यासाठी मुंबई महापालिका, महाराष्ट्र सरकार समर्थ असल्याचेही राऊत यांनी म्हटले.