मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यासंदर्भात एबीपी माझाशी बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या म्हणजे महाभारतातले 'शिखंडी', असं म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.


आरोप करण्यापेक्षा ते सिद्ध करा : महापौर किशोरी पेडणेकर


महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "आपण थोडं मागे गेलो तर महाभारतात किंवा रामायणात असे काही चांगल्या भूमिका होत्या शिखंडीसारख्या. त्यामुळे अशा लोकांना किती मनावर घ्यावं? किंवा त्यांच्याकडे किती लक्षं द्यावं हा प्रश्नच आहे. किरीट सोमय्यांनी आरोप केला म्हणजे, मी आरोपी होत नाही. कारण आरोप करणं सोपं आहे, पण ते सिद्ध करावेत. कारण सोमय्या यांना फक्त त्याच कामांसाठी नेमलं आहे. बऱ्याचदा फ्रॉड हा शब्द उच्चारला नाही, केवळ किरीट सोमय्या म्हटलं तरी फ्रॉड असं म्हणायचं आहे हे कळंत.' पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, 'कोणतीही जनहित याचिका करू देत. आम्ही सगळ्याला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत.'


किरीट सोमय्या यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात महापौर, ठाकरे सरकार विरोधात जनहित याचिका दाखल


महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेत फ्लॅट आणि ऑफिस लाटल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच याची तक्रार करूनही पालिका आयुक्त आणि ठाकरे सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याने महापौरांची चौकशी करून पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणीही भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. अशातच कागदपत्रं पोलीस ठाण्यात सादर करुन तक्रार केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून काल मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली असल्याचं किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.


किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषेद बोलताना म्हणाले की, "सातत्याने ठाकरे सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतरही एसआरए आणि मुंबई पोलिसांनी महापौरांवर कारवाई केली नाही. एवढंच नाही तर महापौरांनी बनावट सह्या करत करार केला. कागदपत्रं पोलीस ठाण्यात सादर करुन तक्रार केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून काल मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे."


पाहा व्हिडीओ : किरीट सोमय्या म्हणजे महाभारतातले 'शिखंडी' :महापौर किशोरी पेडणेकर



काय आहे प्रकरण?


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या मुलाला पालिकेचे कंत्राट मिळवून दिले आहे. तसेच एसआरएची घरे लाटली आहेत. याची तक्रार करूनही पालिका आयुक्त आणि ठाकरे सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याने महापौरांची चौकशी करून पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पालिका मुख्यलयासमोर आंदोलन केलं होतं. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या नावे 'किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी वरळीच्या गोमती जनता सोसायटी, जी के कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई या पत्त्यावर रजिस्टर आहे. याच पत्त्यावर 8 बोगस कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत. त्या सगळ्याच कंपन्यांचे मालकी हक्क, आर्थिक हितसंबंध, व्यवहारातील पारदर्शकता आणि त्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी त्यावेळी केली होती.


महत्त्वाच्या बातम्या :