मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर भाजप सातत्याने शिवसेनेवर हल्लाबोल करत आहे. म्हाडाने वर्षभरापूर्वी धाडलेल्या नोटीसवर बोट ठेवत अनिल परब यांच्यावर आरोप केल्यानंतर भाजपने आपला मोर्चा मुंबईच्या महापौरांकडे वळवला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेत फ्लॅट आणि ऑफिस लाटल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेअंतर्गत गोमाता जनता सोसायटीमधील केवळ ऑफिसच नाही तर फ्लॅटही लाटला. त्यांच्या कुटुंबाच्या किश कॉर्पोरेट कंपनीने तळमजल्यावर सोसायटीच्या कार्यालयासाठी राखीव असलेली जागा लाटली, असा आरोप सोमय्या यांनी केला.


तर किरीट सोमय्या माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. त्यांनी माझ्यावरील आरोप सिद्ध करावेत, आरोप सिद्ध झाले तर मी शिक्षा भोगेन, असं खुलं आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान यावेळी किशोरी पेडणेकर आणि किरीट सोमय्या यांच्या शाब्दिक युद्ध रंगलं.


... तर मी शिक्षा भोगेन : किशोरी पेडणेकर
किरीट सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "बेताल वत्तव्यामुळे किरीट सोमय्या यांची खासदारकी गेलीय. मुळात त्यांच्याप्रमाणे आम्ही काहीही लाटलेलं नाही. माझं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान आहे. मी 2008 मध्ये तिथे भाड्याने राहत आहे. दरवर्षी ते भाडं मालकाला जातं, त्याचे सगळे पुरावे आहेत. किश कॉर्पोरेटचं ऑफिसही भाडेतत्त्वावरच घेतलेलं आहे. त्यामुळे लाटण्याचा प्रश्नच कुठे येतो? आमच्याकडे सगळे पेपर आहेत. माझं घर, वकील चाळ जी अजूनही डेव्हलप होतेय, कदाचित मे महिन्यात त्याचा ताबा मिळेल. तोपर्यंत आम्ही भाड्याने राहतोय आणि दरवर्षी पाच टक्क्यांनी मालकाला वाढवून भाडं देतोय. मी सामान घेऊन कुठे फिरु. तुम्ही आरोप सिद्ध करा. सिद्ध झाले तर मी शिक्षा भोगेन. किरीट सोमय्या माझ्यावर खोटे आरोप करत आहेत."


किशोरी पेडणेकर यांनी पायउतार व्हाव : किरीट सोमय्या
किशोरी पेडणेकर यांनी महापौरपदावरुन पायउतार व्हावं, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, "किश कॉर्पोरेटचं जे ऑफिस आहे ते एसआरएचं आहे. एसआरए सध्या मुंबई महापालिकेच्या ताब्यात आहे. महापौर असताना फ्लॅट आणि ऑफिस लाटण्याचे प्रकार केले आहे, त्यावरुन किशोरी पेडणेकर यांनी पदावरुन पायउतार व्हावं. महापौर सांगतात की त्या भाड्याने राहतात, पण एसआरएच्या नियमानुसार असं भाड्याने राहता येतं का? निवडणूक प्रतिज्ञापत्रात किशोरी पेडणेकर यांनी घरचा पत्ता म्हणून एसआरए सोसायटीमधील फ्लॅटचा पत्ता दाखवला आहे. किश कॉर्पोरेटचं रजिस्ट्रेशन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे, त्याच संचालक होत्या. या ऑफिसची जागा ही सोसायटीच्या ऑफिससाठी देण्यात आली आहे. किशोरी पेडणेकरांनी मुख्यमंत्र्यांनी कायदा समजून घ्यावा. मुंबईच्या महापौर अशाप्रकारे गरिबांची संपत्ती लुटत असेल तर निश्चितपणे सगळ्यांसमोर ठेवणार."