मुंबई : गेल्या काही वर्षांत शिवसेनेशी (shivsena) उघड संघर्षाची भूमिका घेणारे भाजपनेते अँड. आशिष शेलार (ashish shelar)यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी महापौर पेडणेकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी शेलार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे माझ्यासह संपूर्ण स्त्री जातीचा अपमान झाला असून त्यांच्यावर करावाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.


''महापौर म्हणजे मुंबईच्या प्रथम नागरिक आहेत. हे पद अत्यंत महत्वाचे आहे. असे असताना शेलार यांनी असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत असून माझा व समस्त स्त्री जातीचा त्यांनी अवमान केला आहे, त्यामुळे त्याबाबत तक्रार करत असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे. 


महिला आयोगानेही घेतली दखल 
आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. हा अहवाल आल्यानंतर राज्य महिला आयोगाकडून आशिष शेलार यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. तर दुसरीकडे शिवसेनेच्या महिला आघाडीकडूनही आशिष शेलार यांच्याविरुद्ध पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली जाणार आहे. त्यामुळे आशिष शेलार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आशिष शेलार यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाची नवी ठिणगी पडली आहे.  






"महपौरांविषयी मी जे बोललोच नाही त्याचाच प्रसार त्यांचेच सहकारी करीत आहेत"


मी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. ना कोणत्या महिलांबद्दल, ना  महापौर महोदयांन बद्दल. माझी संपूर्ण पत्रकार परिषद न पाहताच ज्यांना कुठेच काही मिळत नाही, ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सार्वजनिक आयुष्यात नितिमूल्य आणि नितिमत्ता पाळणारा मी आहे. शिवसेनेसारखा पाखंडी आणि खोटे पसरवणारा नाही. खोटे बोलणे आणि अपप्रचार ही भाजपची भूमिका नाही.  कुठे तक्रार केली असेल तर त्यातून सत्यच समोर येईल.
माझी महापौरांना  विनंती आहे की,  मी जे बोललोच नाही, तेच तुमचेच समर्थक सोशल मीडियावर लिहित आहेत, पसरवत आहेत. या बदनामी पासून तुम्हीच आता वाचायला हवे, असेही आमदार अँड. आशिष शेलार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्टीकरण दिले. 


काय आहे प्रकरण? 
30 नोव्हेंबर रोजी वरळी येथील बी. डी. डी. चाळीत गॅस सिलेंडर्सचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चार जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी नायर रूग्णालयात दाखल केले होते. यावेळी जखमी बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्या बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाला. या घटनेबाबत 4 डिसेंबर रोजी भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि मुंबई महानरपालिकेवर टीका केली होती. याच पत्रकार परिषदेत महापौर पेडणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. शेलार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्थरातून टीका झाली होती. या वक्तव्यावरून नव्या वादालाही तोंड फुटण्याची शक्यता होती. त्यावरूनच आता महापौर पेडणेकर यांनी शेलार यांच्याविरोधाक तक्रार केली आहे. 


शिवसेना-भाजप वाद पेटणार का? 
युती तुटल्यापासून सुरू झालेला शिवसेना-भाजपमधील वाद नवा नाही. दोन्ही पक्षाचे नेते रोज एकमेकांवर टीका करत असतात. यात अनेकवेळा खालच्या पातळीवरही टीका केली जाते. त्यामुळे दोन्ही पक्षांतील खुन्नस दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आता शेलार यांची जीभ घसरल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. हा वाद कोठेपर्यंत जातोय हे येणारा काळच ठरवेल. 


संबंधित बातम्या 


Ashish Shelar: राज्यात कधीही मध्यावधी निवडणूक लागू शकतात, कार्यकर्त्यांनी तयारीला लागवं : आशिष शेलार


ABP Majha Impact : 'एबीपी माझा'च्या ऑपरेशन लुटारुवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया म्हणाले..