Raj Thackeray :  जैन इंटरनेशनल ऑर्गनाइजेशन चे संस्थापक जैन साधू गुरुदेव नय पद्मसागरजी महाराज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीला शिवतीर्थ येथे आले होते. सकाळी साडे सातच्या दरम्यान नय पद्मासगार महाराज हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले. राज ठाकरे यांची सदिच्छा भेट आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी नय पद्मसागर हे शिवतीर्थवर आल्याची माहिती देण्यात आली. साधारणपणे दोन तास राज ठाकरे आणि जैन मुनी नय पद्म सागर यांच्यामध्ये चर्चा झाली.


'काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी 'शिवतीर्थ' या नव्या घरात प्रवेश केला आहे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मुनी शिवतीर्थ इथे आले होते. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. जैन परंपरेप्रमाणे राज ठाकरे यांच्या नव्या घरात 'पगला' विधी पार पडला आणि त्यासोबत नवकार मंत्रचा जप मुनींच्या माध्यमातून झाला असं  जैन इंटरनेशनल ऑर्गनाइजेशनचे पोलिटिकल हेड शैलेश मोदी यांनी माध्यमांना सांगितले. सोबतच, मुंबई आणि महाराष्ट्रात लोकांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि राज ठाकरे यांच्याकडून काहीतरी चांगलं व्हावं, यासाठी मुनींकडून राज ठाकरे यांना आशीर्वाद देण्यात आल्याचं शैलेश मोदी म्हणाले.


नय पद्म सागर महाराज यांचे अनेक राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. राजकीय कार्यक्रमांना राजकीय नेत्यांसोबत त्यांना याआधी सुद्धा पाहिले गेले आहे. शिवाय अनेक राजकीय नेते त्यांची सदिच्छा भेट आणि आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथ विधी कार्यक्रमादरम्यान सुद्धा नय पद्म सागर  महाराज हे शिवाजी पार्क येथे उपस्थित होते.  नय पद्मसागर महाराज हे विविध ठिकाणी, विविध राज्यात जाऊन जैन समाजाला प्रबोधनाचं त्यासोबतच मार्गदर्शनाचे काम करतात. त्यामुळे जैन समाज मोठ्या संख्येने त्यांना मानणारा आहे. मुंबईमध्ये जैन समाज सुद्धा मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेता या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Ashish Shelar: मुंबई कोस्टल प्रकल्पात अफरातफर झाल्याचा आरोप; आशिष शेलार यांनी 'या' मुद्यांवर शिवसेनेला घेरले!


Devendra Fadnavis : निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवले; देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होणार?