मुंबई: मलबार हिल म्हणजे मुंबईतील सर्वात हायफाय एरिया, या भागात देशातल्या अनेक श्रीमंतांची घरं आणि अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांची कार्यालयं. पण मलबार हिलमध्ये पार्किंगची समस्या (Malabar Hill Parking Problem) मोठी आहे. तसेच गाड्यांच्या हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणाची समस्या आहे ती वेगळीच. पण मलबार हिल्स परिसरातील पार्किंगची समस्या आता सुटणार आहे. राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी या समस्येवर लवकरात लवकर उपाय शोधण्याचे आदेश राज्याच्या परिवहन विभागाला दिले आहेत. 


Malabar Hill Parking Problem: नागरिकांच्या समस्या सुटणार 


मुंबईतील मलबार हिल या परिसरात व्हीआयपी लोकांचं येणं-जाणं असतं. त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाऱ्यांना पार्किंगच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. त्यावर आता राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात येणार आहे. राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी आज सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून बृहन्मुंबई नगर निगम वॉर्डच्या नागरिकांसोबत चर्चा केली. यावेळी नागरिकांनी त्यांना येणाऱ्या पार्किंगच्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. त्यानंतर दीपक केसरकर यांनी त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्याच्या परिवहन खात्याला दिले आहेत. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे संबंधित अधिकारीही उपस्थित होते. 


मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, बीएमसीच्या डी वॉर्डमध्ये वरिष्ठ नागरिकांच्या, फेरीवाल्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवल्या जातील. तसचे या ठिकाणच्या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करण्यात येईल, शौचालयाच्या समस्याही सोडवल्या जातील. या गोष्टींवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, या विभागातील वरिष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं जाईल. त्यांच्यासाठी एक डे केअर योजना सुरू करण्याचं प्रस्तावित आहे आणि त्यांच्या येण्याजाण्यासाठी वेगळ्या बसेसची सोय करण्यात येईल. 


पोहोचण्यापूर्वीच पार्किंगची जागा बुक करता येणार


मुंबईत आता पोहचण्याआधीच आपली पार्किंग जागा, स्लॉट बुक करता येणार आहे. प्रस्तावित मुंबई पार्किंग प्राधिकरणाची मुंबई पार्किंग इंटरफेस प्रणाली लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 38 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) एकात्मिक माहिती तंत्रज्ञान प्रणालीच्या माध्यमातून रस्त्यासह (ऑन स्ट्रीट), रस्त्यालगतच्या (ऑफ स्ट्रीट) तसेच इतर ठिकाणच्या पार्किंगशी संबंधित माहितीचे सर्वंकष डिजिटलायजेशन करण्याच्या उद्दिष्टानं मुंबई पार्किंग पूल (एमपीपी) तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये विद्यमान तसेच प्रस्तावित अशा पार्किंगशी संबंधित प्रकल्पांची शासकीय, व्यावसायिक आणि खासगी संस्थांच्या पार्किंगची संबंधित माहिती एकत्रित केली जाणार आहे.