बीपीसीएल प्लान्टमध्ये स्फोट मुंबई: चेंबूर-वडाळ्याजवळ भारत पेट्रोलियम रिफायनरीमधील (बीपीसीएल) हायड्रोक्रॅकर प्लान्टमध्ये स्फोट झाल्यामुळे लागलेली आग आटोक्यात आली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
काल दुपारी कंपनीतल्या हायड्रोक्रॅकर प्रोसेसरला भीषण आग लागली होती. रात्रभर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करत ही आग आटोक्यात आणली आहे. या दुर्घटनेत बीपीसीएल कंपनीतील 41 कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरू आहेत.
आजूबाजूच्या परिसरातील घरांचं नुकसान
बीपीसीएल कंपनीत लागलेल्या आगीमुळे कंपनीला लागून असलेल्या गव्हाणपाडा परिसरातील घरांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक घरांचे पत्रे उडाले असून घरांच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. स्फोटातून बाहेर पडलेल्या गॅसमुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कालच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
बीपीसीएल रिफायनरीच्या बॉयलरमध्ये काल दुपारी 2 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटानंतर आग आणि धुराचे लोट पसरले होते. पेट्रोकेमिकल प्लान्ट असल्यामुळे हा परिसर अतिशय संवेदनशील आहे. आजूबाजूला दाटीवाटीची वस्ती असल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएल कंपनी भारत सरकारद्वारे नियंत्रित केली जाते. डी. राजकुमार हे बीपीसीएलचे विद्यमान चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. मुंबईत बीपीसीएलचं मुख्यालय आहे. तेल आणि गॅस निर्मिती करणारी ही कंपनी असून, मुंबई आणि कोचीनमध्ये दोन सर्वात मोठ्या रिफायनरी आहेत.
जगातील 'महाकाय 500 कंपन्यांच्या यादीत 2016 साली 'फॉर्च्युन' मासिकाने बीपीसीएलला 358 वं स्थान दिलं होतं.
24 जानेवारी 1976 रोजी बर्मा शेल ग्रुप ऑफ कंपनीला भारत सरकारने टेकओव्हर केलं आणि 'भारत रिफायनरिज लिमिटेड' अशी कंपनी स्थापन केली. त्यानंतर 1 ऑगस्ट 1977 रोजी केंद्र सरकारने या कंपनीचे 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' अर्थात बीपीसीएल असे नामकरण केले.
संबंधित बातम्या
बीपीसीएल पेट्रोलियम प्लान्टमधील स्फोटानंतर आग धुमसतीच