मुंबई : इडली, मेदू वड्याच्या हॉटेलला 'अण्णा' हे नाव वापरण्यास अंतरिम मनाई करण्याचे आदेश देता येणार नाही, असं हायकोर्टानं (High Court) शुक्रवारी स्पष्ट केलं. मात्र 'अण्णा' या नावासंदर्भातील मुळ दाव्यावर पुणे नगर दिवाणी न्यायालयानं जलदगतीनं सुनावणी घ्यावी, असे निर्देश हायकोर्टानं जारी केलेत.
न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठानं यासंदर्भात याचिकाकर्त्यांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. मुळ दाव्यावर सुनवाणी घेताना हायकोर्टानं नोंदवलेल्या मतांचा किंवा आदेशांचा विचार न करता नगर दिवाणी न्यायालयानं प्रत्यक्ष साक्षी-पुराव्यांच्या आधारेच मुळ दाव्यावर निर्णय द्यावा, असंही हायकोर्टानं आपल्या आदेशात म्हटलेलं आहे. अण्णा हे नाव वापरण्यास अंतरिम मनाई करावी, असे कोणतेही ठोस पुरावे याचिकाकर्ते सादर करु शकले नाहीत. त्यामुळे त्यांची ही मागणी मान्य करता येणार नाही. अर्जदार व प्रतिवादी यांचा व्यवसाय बघता पुणे नगर दिवाणी न्यायालयानं या दाव्यावर जलदगतीनं सुनावणी घ्यावी, असं हायकोर्टानं आपल्या आदेशांत नमूद केलं आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे येथे 'अण्णा ईडली गृह' आहे. या नावानं एक आस्थापना नोंदणीकृत असून तसे प्रमाणपत्र शांतप्पा यांच्याकडे आहे. मात्र असं असतानाही मेसर्स या अण्णा नावानं काहीजण व्यवसाय सुरु करत असल्याचं शांतप्पा यांच्या निर्दशनास आलं. त्यामुळे 'अण्णा' या नावावर दावा करत शांतप्पा यांनी पुणे नगर दिवाणी न्यायालयात धाव घेतली. मेसर्स अण्णा यांना 'अण्णा' हे नाव वापरण्यास अंतरिम मनाई करावी, अशी विनंती शांतप्पा यांनी दिवाणी न्यायालयात केली होती, मात्र कोर्टानं ती मागणी फेठाळून लावली. त्यविरोधात शांतप्पा यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
याचिकाकर्त्यांचा दावा
अण्णा इडली या नावाचा ट्रेडमार्क आपल्याकडे आहे. अण्णा ईडली गृह या नावानं त्याची अधिकृत नोंदणी केलेली आहे. ईडली, डोसा व अन्य साऊथ इंडियन पदार्थ आपण याच नावानं विकतो. अण्णा ईडली या नावानं आपण देशभरात व्यवसाय करतो. सोलापूर, नागपूरसह महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी याच नावानं आपला व्यवसाय सुरु आहे. मात्र मेसर्स अण्णा या नावानं शिरोळ रोडवर ईडली, मेदू वड्याचं हॉटेल नव्यानं सुरु होत असल्याचं कळताच त्याविरोधात आपण पुणे दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. मेसर्स अण्णा यांना अण्णा नाव वापरण्यास अंतरिम मनाई करावी, अशी अंतरिम मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
'मेसर्स अण्णा' यांचा युक्तिवाद
अण्णा ईडली गृह हा ट्रेडमार्क केवळ कर्नाटकापुरता मर्यादित आहे. सोलापूर वगळता पुणे किंवा महाराष्ट्रातील अन्य कोणत्या भागात या नावानं व्यवसाय सुरु असल्याचा पुरावा शांतप्पा सादर करु शकलेले नाहीत. तसेच 'अण्णा' या नावावर शांतप्पा दावा करु शकत नाही. या नावानं पुण्यासह महाराष्ट्रातील अन्य भागात अनेक हॉटेल्स् चालवली जात आहेत. परिणामी 'अण्णा' हे नाव वापरण्यास अंतरिम मनाई करु नये, असा युक्तिवाद मेसर्स अण्णा यांच्यावतीनं करण्यात आला होता. जो पुणे दिवाणी न्यायालयानं मान्य करत याचिकाकर्त्यांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे.