मुंबई : एकीकडे मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सरकारकडून सूचना दिल्यानंतर यंदाचा गणेशोत्सव हे मोठे मंडळ साधेपणान साजरे करणार आहेत. तर दुसरीकडे आता कोरोनाची सद्यस्थिती पाहता खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेने घरगुती गणेशोत्सवसाठी सुद्धा गाईडलाइन्स दिल्या आहेत. घरगुती गणेशोत्सवसुद्धा यावर्षी कसा साधेपणाने करता येईल त्यादृष्टीने विचार करून या सूचनांचे आता मुंबईकरांना घरगुती गणपती बसवताना पालन करायचे आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून यंदाचा घरगुती गणेशोत्सव सुद्धा साधेपणाने साजरा होणार आहे. त्यासाठी आता घरी बसवण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती ह्या शाडू मातीच्या त्यात 2 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या असू नयेत. यावर्षी आगमन आणि विसर्जन मिरवणूक न ठेवता त्यात सुद्धा 5 पेक्षा जास्त जण एकत्र जमू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शक्य असल्यास विसर्जन सुद्धा घरच्या घरी करायचे आहेत किंवा माघ महिन्यात किंवा पुढल्या वर्षी गणेशमूर्तीचा विसर्जन करायचं आहे.
घरगुती गणेशोत्सवादरम्यान महत्वचे नियम
- घरगुती गणेशमूर्तींचे आगमन विसर्जन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे. त्यासाठी जास्तीत-जास्त 5 व्यक्तिंचा समूह असावा. आगमनावेळी मास्क / शिल्ड, सॅनिटायझर, सामाजिक अंतर इत्यारदी स्वसंरक्षणाची साधने काटेकोरपणे वापरण्यात यावीत.
- घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी व या मूर्तीची उंची दोन फूटापेक्षा जास्त असू नये किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे.
- घरगुती गणेशमूर्तींची स्थापना करणाऱ्या भाविकांनी दर्शनास येणाऱ्या व्यक्तिंना मास्क परिधान करण्याचा आग्रह धरावा. तसेच त्यांच्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्थाा करावी.
- भाविकांनी स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळीदेखील करता येणे शक्य आहे.
- गणेशमूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.
- नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी जाणे शक्यतो टाळावे.
- शक्यतो लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.
- घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करावे.
सर्व नियम अटीशर्तीचं पालन करणे यावर्षी कोरोनाला हरविण्यासाठी महत्वाचं असणार आहे. कारण ह्या सूचनांचं पालन केलं तर या आनंदाच्या उत्सवात कोरोनापासून आपण दूर राहून हा सण साजरा करू शकता. अन्यथा नियम न पाळणाऱ्या व्यक्तींवर साथरोग कायदा,आपत्ती निवारण कायदा व भारतीय दंड संहिता कायद्यान्वये कारवाईस पात्र राहणार आहे.