Mumbai Local Update : मध्य रेल्वेनं (Central Railway) प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. दादर रेल्वे स्थानकावर (Dadar Railway Station) तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची मुंबईच्या (Mumbai Local News) दिशेनं जाणारी वाहतूक उशिरानं सुरु आहे. तसेच, याच तांत्रिक बिघाडामुळं मध्य रेल्वेच्या (Central Railway News) अनेक एक्स्प्रेस रखडल्याची माहितीही मिळत आहे. ऐन सकाळच्या वेळी मध्य रेल्वेवर झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे कार्यालयाच्या दिशेनं निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे (CSMT) जाणारी वाहतूक उशिरानं सुरु आहे. 


मध्य रेल्वेवर (Mumbai Local) असणाऱ्या दादर रेल्वे स्थानकात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळं मध्य रेल्वेचं वाहतूक वेळापत्रक काहीसं मागे पडलेलं आहे. मध्य रेल्वेवरुन धावणाऱ्या काही गाड्या उशिरानं धावत आहेत. सकाळच्या वेळी अनेक प्रवासी कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडतात. मुंबईसह उपनगरांतीन अनेक प्रवाशांना वाहतूकीसाठी सर्वात सोपा आणि जलद पर्याय म्हणजे, मुंबई लोकल. अशातच जर लवकरात लवकर हा बिघाड शोधून दुरुस्त करण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आलं नाही, तर मात्र मध्य रेल्वेचं वाहतूक वेळापत्रक आणखी कोलमडण्याची शक्यता आहे. 






मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनीही यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "मध्य रेल्वेवरील दादर स्टेशनवर सिग्नल सुरू करताना काही तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे मेन लाइनवर गाड्या उशिरानं धावत आहेत. रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून बिघाड दुरुस्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच समस्येचे निराकरण केलं जाईल."


मध्य रेल्वे प्रशासनाकडून बिघाड शोधून दूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप होऊ नये, यासाठी रेल्वे कर्मचारी लवकरात लवकर बिघाड दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण अद्यापही बिघाड दूर न झाल्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक काहीशी उशिरानं सुरु आहे.