Aaditya Thackeray : राज्यात मुख्यमंत्री कोण हे देवालाच माहीत, असल्याचे वक्तव्य करत, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) टोला लगावला. खोके सरकार निवडणूक घ्यायला घाबरत आहे. जर घाबरत नसते तर हे 40 गद्दार राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे गेले असते, असेही ठाकरे म्हणाले. घाबरुन खोके सरकार काम करत आहे. त्यांना निवडणुका घ्यायच्या नसल्याचे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.


स्वरगंधार आणि मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'द रिव्हर फेस्ट' ला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली, यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे देखील उपस्थित होते. यावेळी म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर हेही उपस्थित होते.


मला स्वतः चे हात चिखलात घालायचे नाहीत, आदित्य ठाकरेंचा रामदास कदमांना टोला


शिंदे गटाच्या कार्यक्रमाबद्दल देखील आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की,  त्यांच्याकडे लक्ष देऊ न देता, आज मी इथे दिवाळी साजरी करायला आलो आहे. तसेच रामदास कदम यांच्याबद्दल मला बोलायचं नाही. कारण मला स्वतः चे हात चिखलात घालायचे नाहीत असा टोला देखील आदित्य ठाकरेंनी रामदास कदमांना लगावला. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून पोस्ट लागले आहे. यावरही आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला, यावेळी ते म्हणाले की, चांगलं आहे, त्यावर काय बोलू.


होर्डिंग्जसाठी एवढे पैसे आले कुठून


गद्दारांनी मुंबईत एवढे बॅनर लावले आहेत की मळमळायला लागले आहे. अंत असतो होर्डींग लावायलाही. होर्डिंग्जसाठी एवढे पैसे आले कुठून, बेस्टचे खरंच एवढे स्पॉट त्यांनी जर खरेदी केले असतील एवढे पैसे कुठून आले असा सवालही ठाकरेंनी केला. खोटी प्रतिज्ञापत्र सादर केली ही बातमी खोटी आहे. बातमीच्या सोर्सवर विश्वास ठेवू नका असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, विस्तार करणार तर काय करणार, जे नाराज आहेत जे आमचे झाले नाहीत ते त्यांचे काय होणार असेही ते म्हणाले.