Mumbai Local Train Mega block:  सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी अनेकजण प्रवासाचे नियोजन करतात. यामध्ये पर्यटन, नातेवाईकांच्या भेटीगाठी आदी नियोजन असते. मध्य रेल्वेच्यावतीने (Central Railway) , रविवारी 8 जानेवारी रोजी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. या रविवारी असणारा मेगाब्लॉक हा हार्बर ( Harbour line) आणि ट्रान्सहार्बर मार्गांवर ( Trans harbour line) असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर या रविवारी मेगाब्लॉक नसणार. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक असणार आहे. 


पश्चिम रेल्वेवर कुठं असणार मेगाब्लॉक?


पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरिवली अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद गाड्या अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. काही लोकल रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. 


ट्रान्स हार्बर मार्गावर असा असणार मेगाब्लॉक


ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10  वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 
 
ठाणे येथून  सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09  वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द असणार आहे. 
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून  सकाळी 11.04 वाजून ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलकरीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहे. त्याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. 
 
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.07 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 वाजेपर्यंत  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


विशेष लोकल सेवा


ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी 8 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. 


शनिवारी मध्यरात्री नाहूर ते मुलुंड दरम्यान विशेष ब्लॉक


शनिवारी-रविवारच्या मध्यरात्री  नाहूर आणि मुलुंड दरम्यान गर्डरच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवार-रविवार मध्यरात्री 1.20 ते 4.20  वाजेपर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गावर आणि 1.20 ते 5.15 वाजेपर्यंत विक्रोळी आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद आणि धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. 


ब्लॉकमुळे मेल एक्सप्रेसमध्ये बदल


ट्रेन क्रमांक-11020 कोणार्क एक्स्प्रेस ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेशन होईल.


ट्रेन क्रमांक-12810  हावडा-मुंबई सीएसएमटी मेल दादर येथे शॉर्ट टर्मिनेशन होईल.


या एक्स्प्रेस  40 ते 65 मिनिटे उशिराने पोहचणार


ट्रेन क्रमांक-18030 शालीमार एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक-18519  विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक-12134  मंगलोर-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक-20104  गोरखपूर-एलटीटी एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक-12702  हैदराबाद-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस