मुंबई: घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन सेवा ही  शहराची लाईफलाईन मानली जाते. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गाने दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. यापैकी मध्य रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Trains) वेळापत्रकात आता महत्त्वाचे बदल होणार आहेत. येत्या 5 ऑक्टोबरपासून हे नवे बदल लागू होणार आहेत. त्यानुसार आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकातून सोडल्या जाणाऱ्या 20 फास्ट लोकल ट्रेनचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. 


या लोकल ट्रेन आता CSMT स्थानकातून न सुटता दादर स्थानकातून सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात रेल्वे फलाटांची संख्या मर्यादित आहे.  त्यामुळे अनेकदा फास्ट लोकल वेटिंगवर असतात आणि ट्रेन सुटायला उशीर होतो. परिणामी या लोकल गाड्यांचे पुढील वेळापत्रक बिघडते आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे मध्य रेल्वेने 20 जलद मार्गावरील लोकल ट्रेन आता दादर स्थानकातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दादर स्थानकात कायम प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे येथूनच फास्ट लोकल सुटल्यास प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच ठरलेल्या वेळेत या लोकल गाड्यांनी स्थानक सोडल्यास पुढील प्रवासही नियोजित वेळेत शक्य होईल. या निर्णयामुळे सीएसएमटी स्थानकातील गर्दीही कमी होण्यास मदत होईल.


दर अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन सुटणार


मुंबईतील लोकल प्रवास सुखकारक करण्यासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावर कम्बाईन कम्युनिकेशन्स बेस्ड कंट्रोल ट्रेन  कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणा वापरण्यात येणार आहे.  त्यामुळे दोन लोकलमधील वेळेचे अंतर 180 सेकंदांवरुन 150 सेकंदांपर्यंत (अडीच मिनिटे) कमी होणार आहे. त्यामुळे मुंबईतील तिन्ही रेल्वेमार्गांवरील गाड्यांना होणारा उशीर टळणार आहे.


वेस्टर्न रेल्वेमार्गावर 150 लोकल रद्द होणार


पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेनच्या तब्बल 150 फेऱ्या रद्द होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर सध्या मालाड स्थानकापर्यंत सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. मात्र, हे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यामुळे 4 ऑक्टोबरपर्यंत या मार्गावरील लोकल गाड्यांच्या 150  फेऱ्या रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे.


आणखी वाचा


लोकल अन् रेल्वेतून प्रवास विनातिकीट करणाऱ्यांवर मध्य रेल्वे सर्जिकल स्ट्राईक करणार, रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवणार?


रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, दर अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन, सीबीटीसी यंत्रणेमुळे मोठा दिलासा मिळणार