Mumbai Local Train Death Rate : मुंबईतील सर्वात मोठी दहशतवादी 'मुंबई लोकल' आहे, कारण मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणारे मृत्यूदर हे 38.08 टक्के इतकं आहे. म्हणजेच प्रत्येक दिवशी 7 प्रवासी आपला जीव प्रवासात गमावतात. याची दखल मुंबई हायकोर्टाने घेतली असून, हा जगातील सर्वाधिक मोठा मृत्यू दर असल्यानं ती एक लज्जास्पद बाब असल्याचे ताशेरे हायकोर्टानं ओढलेत. यावर दोन्ही रेल्वे प्रशासनाच्या महाव्यवस्थापकांना सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश जारी करत सॉलिसिटर जनरल यांना पुढील सुनावणीत कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिलेत. 


मुंबईची लोकल हीच मुंबईची दहशतवादी आहे, असे आम्ही का म्हणतोय तर याचे कारण हायकोर्टाच्या सुनावणीत समोर आले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या मृत्यूसंदर्भात पालघरस्थित यतीन जाधव यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू झाली. मुंबईतील उपनगरीय रेल्वेमुळे होणारा मृत्यूदर हा 38.08 टक्के असून हाच मृत्यूदर न्यूयॉर्कमध्ये 9.08 टक्के, फ्रान्समध्ये 1.45 टक्के आणि लंडनमध्ये 1.43 टक्के इतका असल्याचं या याचिकेत म्हटलंय. 


काय म्हटले आहे याचिकेत? 


उपनगरीय रेल्वेतून 2023 मध्ये 2 हजार 590 प्रवाशांनी आपला जीव गमावला असून सरासरी दररोज सात जणांचा मृत्यू झाला आहे. यात मध्य रेल्वेवरील अपघातांमध्ये 1 हजार 650 जणांचा तर पश्चिम रेल्वेवर 940 जणांचा मृत्यू झालाय. तर एकूण 2 हजार 441 जण जखमी झाल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्यावतीनं वकील रोहित शहा यांनी हायकोर्टाला दिली. यात रेल्वे रुळ ओलांडताना, रेल्वेतून पडून अथवा रेल्वेच्या खाबांना आदळून झालेल्या घटनांची नोंद आहे. 


मात्र रेल्वेकडून पायाभूत सोयीसुविधा आजही तेवढ्याच आहेत. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करणं म्हणजे एखाद्या युद्धावर जाण्यासारखं असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केला आहे. परदेशातील रेल्वेप्रमाणे काचेचे दरवाजे, योग्य ठिकाणी रेल्वेचे पादचारी पूल असणं इत्यादी गोष्टींकडे लक्ष दिल्यास मृत्यूदर कमी होऊ शकतो असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. 


मुंबईच्या लोकल मधून आजघडीला देखील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मिळून 65 लाखांपेक्षा जास्त प्रवासी दररोज प्रवास करतात. तर दिवसभरात तिन्ही लाईनवर 3 हजार पेक्षा जास्त लोकल धावतात. मात्र लोकलची संख्या कितीही वाढली तरीही मुंबईतील वाढलेली प्रवाशांची संख्या या लोकल मध्ये सामावू शकत नाही. 


मुंबईत पीक आणि रश अवर कोणते आहेत? 



  • सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 हे मुंबईतील लोकल मधील सर्वात गर्दीचे तास आहेत. 

  • या पीक अवर दरम्यान प्रत्येक 3 ते 4 मिनिटाला 1 अशा 18 लोकल एका तासात धावतात. 

  • गेल्या 7 वर्षात 150 नवीन लोकल फेऱ्या वेळापत्रक समाविष्ट करण्यात आल्या. आता रेल्वे प्रशासनाची क्षमता संपली. 

  • 1956 साली मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने देखील मुंबईतील कार्यालयीन वेळा बदलाव्या अशी सूचना दिली होती. 


हायकोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर रेल्वेची बाजू मांडणाऱ्या अॅड. सुरेश कुमार यांनी रेल्वेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. 2008 पासून पश्चिम आणि मध्य रेल्वेने कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अनेक उपाययोजना केल्या आहेत. याआधी ज्या याचिका दाखल झालेल्या त्यावर कोर्टाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन रेल्वेकडून करण्यात आले आहे. जसे की प्लॅटफॉर्म आणि लोकल मधील गॅप कमी करणे, रेल्वे रुळांच्या मध्ये बरिकेट्स लावणे अशा अनेक गोष्टी आम्ही केल्या आहेत, त्यामुळे रेल्वे अपघातांमध्ये कमी आली आहे. मात्र रेल्वेच्या या दाव्यामध्ये काहीही तथ्य नसून आता राज्य सरकारने याबाबत पाऊले उचलायला हवी असे प्रवासी संघटनांचे मत आहे. 


मुंबई लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मुंबईसह मुंबईकरांच्या सर्वांगीण विकासात मुंबई लोकलचा असामान्य असा वाटा आहे. जसजशी लोकलची वाढली तसतशी मुंबईची गर्दी देखील वाढत गेली. त्यामुळेच लोकलमधून पडून होणाऱ्या मृत्यूची संख्या देखील वाढली. अखेर आता हीच जीवनवहिनी मुंबईकरांसाठी दहशतवादी बनू लागली की काय असा प्रश्न निर्माण होतो. 


ही बातमी वाचा: