मुंबई : लोकलच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सुरु असलेल्या मुंबई लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करून अधिकच्या लोकल सेवा चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र सोशल मीडियावर याचा चुकीचा अर्थ घेतला जात असून येत्या 29 तारखेपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी देखील लोकलसेवा सुरु होणार असल्याचं पसरवलं जात आहे. त्यामुळे असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मिळून 2781 लोकल सेवा चालवल्या जात आहेत. त्यात वाढ करून येत्या 29 जानेवारीपासून 2985 लोकल चालवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यामुळे मध्य रेल्वेवर धावत असलेल्या 1580 लोकल सेवा वाढवून त्या 1685 करण्यात आल्या आहेत. तर पश्चिम रेल्वेवरील 1201 लोकल सेवांमध्ये वाढ करून आता 1300 लोकल सेवा चालवल्या जातील. लोकल मधील वाढत चाललेल्या गर्दीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं रेल्वे प्रशासनाच्या वतीनं सांगितलं जात आहे.
दुसरीकडे आज सोशल मीडियावर पश्चिम रेल्वेचं एक पत्र फिरत होतं. ज्यावरून सर्वसामान्य प्रवाशांसाठी 29 तारखेपासून लोकल सेवा सुरु केल्या जातील, असं सांगण्यात येत होतं. मात्र केवळ राज्य सरकारनं अनुमती दिलेल्या प्रवाशांसाठी लोकल सेवा असेल असं, रेल्वे प्रशासनानं परिपत्रक काढून जाहीर केलं आहे. तसेच इतर प्रवाशांना स्थानकात येऊ नका, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईत लोकल सेवा सर्वांसाठी लवकरच सुरु होणार!, मुख्यमंत्र्यांकडून संकेत
सर्वसामान्य लोकांसाठी मुंबई लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न लाखो मुंबईकरांना पडला आहे. आता लवकरच सर्वसामान्यांसाठी देखील लोकल रेल्वे सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह, यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.